Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedपरराज्यात महिलांची विक्री करणारी टोळी जेरबंद

परराज्यात महिलांची विक्री करणारी टोळी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar

पळवून नेलेल्या महिला आणि मुलींचे परस्पर लग्न लावून देवून त्यांची फसवणूक करणारी टोळी अनेक महिन्यांपासून कार्यरत असल्याची चर्चा होती. या टोळीचा पोलीस शोध घेत होते. अखेर या टोळीतील चार जणांना छावणी पोलिसांनी राजस्थान आणि गुजरात येथे जाऊन जेरबंद केले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार आरोपीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे, अशी माहिती छावणी पोलिसांनी दिली. 

- Advertisement -

छावणी परिसरात राहणारी महिला अचानकरित्या ४ मार्चपासून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. छावणी पोलिसांनी तांत्रिक तपास करून बन्सीलाल मुलाजीराम मेघवाल (वय ५०,रा. बोरनाडा. ता.जि. जोधपुर, राजस्थान), लिलादेवी जेठाराम मेघवाल (वय ४२,रा. आरतीनगर-पालगाव, बोरनाडा, ता.जि. जोधपुर, राजस्थान), हारून खान नजीर खान (वय ४०,रा. बिस्मिल्ला कॉलनी, मिसारवाडी), शबाना खान (वय ३६,रा. बेरीबाग, हर्सूल) या चार जणांना राजस्थान आणि गुजरात येथे जाऊन अटक केली. पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, छावणी विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश केदार, लक्ष्मण उंबरे, पोलीस अंमलदार नारायण पायघन, सिध्दार्थ थोरात, सुमेध पवार, मंगेश शिंदे, महिला पोलीस अंमलदार मीना जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश केदार करीत आहेत.

शहरात राहणाऱ्या गरीब आणि गरजवंत महिला अथवा मुलींना हेरल्यानंतर त्यांना परराज्यात चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून हारूण खान व शबाना हारूण खान हे पळवून नेत असत. त्यानंतर राजस्थान आणि गुजरात येथील त्यांचे साथीदार बन्सी मेघवाल आणि लिलादेवी मेघवाल यांच्या मदतीने त्या महिला व मुलीचे परस्पर लग्न लावून देत त्यांची विक्री ही टोळी करीत होती. या टोळीकडून शहरातील अनेक मुलींना पळवण्याचे प्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

बनवला अश्लील व्हिडिओ

शहरातील ३० वर्षीय महिला कामाच्या शोधात होती. त्यावेळी शबाना आणि हारून यांनी तिला काम देण्याचे आमिष दाखवून वाहनात बसवून नेले. तेथे जेवणातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. त्यानंतर राजस्थानात नेऊन बन्सीलाल, मनोज आणि महावीर या तिघांनीही अत्याचार केले. त्यानंतर २ लाख ८० हजार रुपये घेऊन दिनेश भादू नावाच्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले. दोन महिन्यांत तीन वेळा अशीच विक्री केली. मात्र, ३ मार्च रोजी संधी साधून महिला या टोळीच्या ताब्यातून निसटली . तिने जोधपूर येथून एका व्यक्‍तीच्या फोनवरून नातेवाइकाशी संपर्क केला. त्यांनी जोधपूरवरून विमानाचे तिकीट बुक केले. महिला जोधपूर येथून इंदूर येथे आली आणि इंदूरवरून खासगी बसने छत्रपती संभाजीनगरला ७ मार्च रोजी पोहोचली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या टोळीचा छडा लावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या