Sunday, May 5, 2024
Homeनगरजिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपात खल सुरूच

जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपात खल सुरूच

गोंदकर, कापसे, देसाई, पारखी, गांधींची नावे चर्चेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण आणि शहर जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या पदाच्या निवडीचा चेंडू श्रेंष्ठीच्या कोर्टात ढकलण्यात आला. सध्या या पदांबाबत श्रेष्ठींमध्येही खल सुरू आहे. नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडी आज-उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

आता उत्तर नगर जिल्ह्यासाठी शिर्डीचे राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती पुढे आली आहे. दक्षिणेसाठी विद्यमान अध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, कर्जतचे स्वप्नील देसाई तर नगर शहरसाठी सचिन पारखी आणि मिलिंद गांधी यांची नावे पुढे आली असल्याची माहिती समजली आहे.

नगर दक्षिण, नगर उत्तर आणि नगर शहर (महानगर) असे तीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नगरमध्ये शुक्रवारी भाजपची बैठक झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार उपस्थित होते. यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पण स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने जिल्ह्यातील तिनही जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेश कार्यालयातून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर खल सुरू झाला आहे.

नगर जिल्ह्यात राजकीय परिस्थिती काहीशी बदलली आहे. त्यामुळे आगामी काळात आव्हान राहणार असल्याने पुढे मोर्चेबांधणी कशी करता येईल आणि त्यादृष्टीनेच नव्या जिल्हाध्यक्ष निवडण्यात यावा याबाबतही विचारमंथन सुरू आहे.

दरम्यान, दक्षिणेसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांनी स्वतः नकार दिला. प्रा. भानुदास बेरड यांची चांगली कामगिरी झाल्याने त्यांना प्रदेश कार्यकारिणीत घेण्याचे ठरविण्यात आल्याचे समजते. तसेच उत्तरेसाठी नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तयारी दर्शविली होती. एवढेच नव्हेतर त्यांनी मुलाखतही दिली होती. मात्र आता त्यांनी माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या