Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजिल्ह्याचा गौरवशाली इतिहास मांडला जाणार; कॉफीटेबल बुक प्रसिद्ध करणार

जिल्ह्याचा गौरवशाली इतिहास मांडला जाणार; कॉफीटेबल बुक प्रसिद्ध करणार

नाशिक । नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेस दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येत्या मे महिन्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या त्याद्वारे जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास आणि प्रगतीचे टप्पे मांडले जाणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात शुक्रवारी (दि.18) विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचना मागवल्या. मांढरे म्हणाले, 1870 मध्ये जिल्ह्याची निर्मिती झाली. पूर्वी बागलाण प्रांत अहमदनगर जिल्ह्यात समाविष्ट होता. ओव्हन्स हे जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी होते. त्यानंतर काथावाला आणि अलमौला हे पहिले भारतीय जिल्हाधिकारी झाले. पिंपरूटकर यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिले मराठी जिल्हाधिकारी लाभले. चांदवड हे त्या काळात महत्त्वाचे केंद्र होते. शहरात सृजनशिलता मोठ्या प्रमाणात आहे.

- Advertisement -

जिल्ह्याने प्रगतीचे अनेक टप्पे अनुभवले आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जगासमोर आणताना नाशिकचे ब्रँडिंगही होणे गरजेचे आहे. हवामान, संस्कृती, कला, क्रीडा, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रात जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. जिल्ह्याला 150 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही ओळख अधिक प्रभावीपणे देशपातळीवर पोहोचविण्यासाठी कायमचे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यापुढील काळातदेखील असे प्रयत्न कायम रहावेत, यादृष्टीने नाशिककरांचा आयोजनात उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमास सहकार्य करण्याचे मान्य केले असून प्रत्येकाने आपला कार्यक्रम म्हणून यात जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित कलाकार, आर्किटेक्ट, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, साहित्यिक आदींनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचे मान्य करताना कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिकची ओळख सर्वदूर पोहोचवण्यासाठी योगदान देण्याचे मान्य केले.

कॉफीटेबल बुक प्रसिद्ध करणार
कॉफीटेबल बुक आणि विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून नाशिकची माहिती नागरिकांसमोर मांडण्याचा मनोदय जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील गडकिल्ले, जैवविविधता, दादासाहेब फाळके यांचे कार्य, गोदवारीचे महत्त्व, नाशिकची खाद्यसंस्कृती, पुरातत्वशास्त्राच्या दृष्टिकोनातून नाशिकचे महत्त्व, जिल्ह्यातील शहीद जवान, कला-क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी मंडळी यांची माहिती त्यात असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या