Friday, May 3, 2024
Homeनगरवाहतूक शाखेच्या निरीक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

वाहतूक शाखेच्या निरीक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी : रास्ता रोकोचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरामध्ये जड वाहतुकीला बंदी असून देखील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी बायपासवर थांबून जड वाहतूक शहरात दाखल करण्यासाठी पैसे घेतात. वाहतूक शाखेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात एका महिन्यात तीन बळी गेले असल्याचा आरोप करत वाहतूक शाखेच्या निरीक्षकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्त्वाखाली भिंगार शहर उपाध्यक्ष शहानवाज काझी, सिद्धार्थ आढाव, फैम शेख, विशाल बेलपवार, सलमान शेख, सद्दाम शेख, शहाबाज शेख, लियाकत शेख, इरफान शेख, मुनव्वर सय्यद, अनिस पठाण, अतिक शेख, आकीब शेख, शरद वाघमारे यांनी हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना दिले. त्यात म्हटले आहे, की या अपघाती घटना शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या निष्काळजीपणा मुळे झाल्या आहेत. नेमणूक केलेल्या फिक्स पॉइंटवरून या शाखेचे पोलिस कर्मचारी वाहनांच्या मागे हप्ते घेण्यासाठी गायब होतात.

प्रत्येक चौकात पोलीस कर्मचारी प्रामाणिकपणे ड्युटी करत असतील तर शहरांमध्ये जड वाहतूक येणार नाही. पोलिसांचा धाक आणि दबाव राहिल्यास चालक वाहतुकीच्या नियमाचे पालन करतील.

शहर वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक आणि कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे शहरातील वाहनचालकासह पदचार्‍यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. एका महिन्यात केडगाव, पत्रकार चौक, इंपिरियल चौक या तीन ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन जणांना जीव गमवावा लागला.

या शाखेला आणखी किती जणांच्या मृत्यूची प्रतिक्षा आहे. सतत होणार्‍या अपघात आणि वाहतुकीच्या ढिसाळ नियोजनामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची जिल्ह्याबाहेर तातडीने बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. असे न केल्यास 27 जानेवारीला स्टेट बँक चौक येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या