Sunday, May 5, 2024
Homeनाशिककेंद्रीय अर्थसंकल्प २०२० : कही खुशी कही गम

केंद्रीय अर्थसंकल्प २०२० : कही खुशी कही गम

नाशिक | प्रतिनिधी 

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या संसदेतील लांबलचक अर्थसंकल्पीय भाषणानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या नेत्यांमध्ये कही खुशी कही गम अशीच प्रतिक्रीया पहायला मिळाली. सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यानी कुचकामी निराश करणारा अर्थसंकल्प असल्याची टिका केली आहे. तर विरोधी पक्षात असलेल्या भाजपने अर्थसंकल्पाची स्तुती करणारी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

- Advertisement -

वास्तवाचे भान हरवलेला अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे.या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पुर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेले अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिले गेल्याचे दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे, तिचा आणि प्रस्तावित रेल्वे लाईनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही.
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र मुंबईसाठी काहीच नाही
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यानी देखील महाराष्ट्र आणि मुंबईला या अर्थसंकल्पाने काहीच दिले नसल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. माध्यमांना प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठोस काही नाही. ह्या अर्थसंकल्पामध्ये नवीन काही नाही. नवीन बाटलीत जुनी दारू आहे.शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार आधी सांगितले, पण त्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी विकास दर ११ टक्के असला पाहिजे पण तो फक्त २ टक्क्याच्या आसपास आहे. त्यामुळे ही पोकळ घोषणा असून शेतक-यांची फसवणूकच आहे
बाळासाहेब थोरात,महसूल मंत्री

महाराष्ट्रासाठी निराशाजनक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प महाराष्ट्राची निराशा करणारा आहे. या अर्थसंकल्पातून काहीही साध्य होणार नाही. मोठे आकडे टाकून भुलभुलय्या केली जात आहे. एकीकडे देशाचा जीडीपी खाली जातोय असे अर्थतज्ञ सांगत असतांना हे मात्र वाढणार असे सांगताय. देशाच्या मालकीच्या एअर इंडिया सारख्या संस्था एकीकडे विकायला काढल्या जात आहे. एलआयसी मधील शेअर विकून त्याचे खासगीकरण केले जात आहे. बँकेत ठेवलेल्या रक्कमेवर पूर्वी एक लाखांपर्यंत विमा सरंक्षण होते. ते आता पाच लाखांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पुन्हा ५ नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली आहे. मात्र गेल्या वेळेस सरकारने देशातील १०० शहरांना स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत काय झाले ? गेल्या वेळी ओबीसी आणी एससीसाठी ५३ हजार ७०० रुपये बजेट मध्ये तरदूत होती. मात्र सरकार १० टक्कयांपेक्षा जादा खर्च करु शकली नाही. अर्थसंकल्पातून लॉलीपॉप दाखविण्याचे काम करण्यात आले आहे.
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

सुधारणावादी अर्थसंकल्प
शेतकरी, कामगार आणि कष्टकर्‍यांची काळजी घेण्याबरोबरच ग्रामोदयाचा मार्ग अधिक सुकर आणि गतिमान करणारा अर्थसंकल्प असून नव्या दशकाकडे वाटचाल करताना आधुनिकतेची कास धरत भारताला नवभारताकडे नेणारा हा सुधारणावादी अर्थसंकल्प आहे.
देवेंद्र फडणवीस,विधानसभा विरोधी पक्षनेते

अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल
मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा करदात्यांना दिलासा देणारा, शेतक-यांचा विकास देणारा, रोजगाराची नवीन संधी देणारा व देशाच्या सुरक्षिततेसाठी अधिक आर्थिक तरतूद करणार आहे. आजच्या अर्थसंकल्पात स्वास्थ, संपन्नता व सुरक्षा या प्रमुख गोष्टींवर भर देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. कररचनेतील नवीन बदलाचा लाभ कोट्यवधी करदात्यांना मिळणार आहे. शेतक-यांच्या विकासाच्या नवीन सुविधा व योजना सुरु करण्यात येणार असल्यामुळे त्याचा खरा फायदा बळीराजाला मिळणार आहे.
प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेता विधान परिषद

सर्वंकष अर्थसंकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सूत्रानुसार देशाची अर्थव्यवस्था बळकट करतानाच शेतकरी, महिला, युवा, अनुसूचित जाती, आदिवासी, व्यापारी, नोकरदार अशा सर्वांच्या कल्याणासाठी तरतूद करणारा सर्वंकष अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण अर्थसंकल्पाचे स्वागत करतो.
चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष

समृद्ध आणि शक्तीशाली
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समृध्द, शक्तीशाली व आनंदी भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे
आ. सुधीर मुनगंटीवार,माजी अर्थमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या