Friday, May 3, 2024
Homeनाशिक३० मार्चनंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ

३० मार्चनंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकसह इतर सहा जिल्ह्यांत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून त्यामुळे या जिल्ह्यांना कर्जमुक्तीच्या दुसर्‍या यादीतून वगळण्यात आले आहे. ३० मार्चनंतर ही आचारसंंहिता संपुष्टात येणार असून त्यानंतरच या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांंना कर्जमुक्तीसाठी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाशिक, अमरावती, नांदेड, नंदूरबार, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना दुसर्‍या यादीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवत शेतकर्‍यांचे २ लाखांचे कर्जमाफ केले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.२४ फेब्रुवारीला पहिली यादी जाहीर झाली. त्यात नाशिक जिल्ह्यातील चांदोरी व सोनांबे या गावांतील ७५० हून अधिक शेतकर्‍यांंना कर्जमाफी देण्यात आली.

दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होणार होती. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत ही यादी अडकली. परंतु शासनाने त्यात निर्णय घेत कर्जमुक्तीस पात्र असलेल्या राज्यांतील ३४ जिल्ह्यांपैकी २८ जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्यातील १५ जिल्ह्यांची संपूर्ण शेतकरी खातेदारांची यादी जाहीर झाली आहे.

परंतु, १३ जिल्ह्यांतील काही तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुका असल्याने त्यांची या निवडणुकांचे तालुके वगळून म्हणजे अंशत: यादी जाहीर केली आहे. तर ६ जिल्ह्यांत ग्रामपंचायत निवडणुकांची संख्या अधिक असल्याने त्यांची यादीच जाहीर केली नाही. त्यात नाशिकचाही समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात ४ तालुक्यांत तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहे. त्यासाठी २९ मार्चला मतदान तर ३० मार्च रोजी मतमोजणी आहे. त्यानंतरच कर्जमुक्तीचा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना मिळणार असून त्यांना ३० मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या