Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमार्ग बदलला, यश कायम

मार्ग बदलला, यश कायम

डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांचे नाव सध्या भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत म्हणून चर्चेत आले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाविषयी त्यांनीच व्यक्त केलेले मनोगत…

व्यवसायात मार्ग बदलावा लागला तरी शिकण्याची इच्छा आणि योग्य ठिकाणी जोखीम पत्करण्याची वृत्ती असेल तर यशस्वी होता येते. बॉल बेअरिंगचा व्यवसाय तोट्यात जाऊनसुद्धा नंतर कुटुंबाच्या परंपरेनुसार शेअर मार्केटमध्ये काम करताना मी वेगळी वाट स्वीकारली आणि नंतर किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात पदार्पण करून डी-मार्टची मुहूर्तमेढ रोवली. माझा जन्म 1954 मध्ये झाला. मला उच्चशिक्षण घेता आले नाही. माझ्या घरातील लोक शेअर बाजाराचे काम करीत असत. परंतु मी मात्र वेगळा व्यवसाय स्वीकारला. मी बॉल बेअरिंगचा व्यवसाय करीत असे. परंतु वडिलांच्या निधनानंतर मी आर्थिक संकटात सापडलो आणि मला तो व्यवसाय बंद करावा लागला. नंतर मी शेअर बाजारात मध्यस्थाचे काम करू लागलो. सुरुवातीची दोन वर्षे शेअर बाजाराची माहिती घेण्यातच निघून गेली. मी त्या काळचे सर्वांत यशस्वी बाजार संचालक मनू मानेक यांच्या धोरणांचे अनुसरण केले.

- Advertisement -

बाजारात पैसा कमवायचा असेल तर मध्यस्थ म्हणून काम न करता आपण स्वतःच शेअर बाजारात गुंतवणूक करायला हवी, हे मला लवकरच कळून चुकले. नंतर मी शेअर बाजारात पैसा लावायला सुरुवात केली. शेअर बाजारात काम करीत असताना मी बराच नफा कमावला. बाजारातील चढउताराचा मी फायदा घेत असे. उदाहरणार्थ, हर्षद मेहताच्या घोटाळ्याच्या वेळी शेअरच्या किमतीत होऊ घातलेल्या घसरणीचा आधीच अंदाज लावून मी (शॉर्ट सेलिंग) व्यवहार केले. त्यामुळे मला खूप पैसा मिळाला. तसे करणे ही त्याकाळी रुजलेली गोष्ट नव्हती. जोखमीने युक्त व्यावसायिक परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठीची युक्ती मी पहिल्या पिढीचे गुंतवणूकदार चंद्रकांत संपत यांच्याकडून शिकलो. त्यांना मी माझा गुरू मानतो. संपत यांच्या प्रभावामुळे प्रेरित होऊन मी दीर्घकालीन गुंतवणूक करू लागलो. नंतर मी किरकोळ व्यापार करण्याचे योजिले आणि 2002 मध्ये डी-मार्टची मुहूर्तमेढ रोवली. एक गुंतवणूकदार म्हणून मी अत्यंत विचारपूर्वक हे पाऊल उचलले आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरणही आजमावून पाहिले.

मी डी-मार्ट स्टोअर्स सुरू करण्यासाठी कधीच भाड्याने जागा घेतली नाही, तर जागा खरेदी केली. दीर्घ कालावधीसाठी हे माझ्या फायद्याचेच ठरले. मी विक्रेते आणि पुरवठादार दोहोंशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे त्यांनी माझी कधीच फसवणूक केली नाही. ग्राहकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यामुळे मी विक्रेते आणि पुरवठादारांना दररोज पेमेन्ट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुरवठादारांकडून मला स्वस्त दरात वस्तू मिळू लागल्या आणि मी लोकांना मोठ्या सवलती देऊ लागलो. डी-मार्टच्या यशस्वितेचे हेच गुपित आहे. शेअर बाजारात डी-मार्टच्या यशस्वितेमुळे आज माझी गणना देशातील अतिश्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.

राधाकिशन दमानी, डी. मार्ट संस्थापक

- Advertisment -

ताज्या बातम्या