Sunday, May 5, 2024
Homeनाशिकशिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन

शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षण प्रक्रियेतील बदल समाज घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच नावीन्यपूर्व विचारांचे आदान-प्रदान होऊन त्यातून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिल्या आहेत.

- Advertisement -

तालुकास्तरावर एकदिवसीय शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन १६ मार्चपर्यंत करण्यात येणार असून याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. मूल शिकावे म्हणून शिक्षकांनी केलेल्या विविध प्रयत्नांतून शाळांमध्ये नावीन्यपूर्ण अध्यापन तंत्राचा वापर केला जात आहे.

लोकसहभागातून शाळा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्या गेल्या आहेत. या नव्या विचारधारेने मार्गक्रमण करत असताना शाळा आधुनिकतेची कास धरून पुढे जात आहेत. शिक्षकांच्या मनोवृत्तीत बदल होत असून ते परिवर्तनाचे दूत होत आहेत. या परिवर्तनाच्या सर्व प्रक्रियेत शिक्षक, मुख्याध्यापक, क्षेत्रिय अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा व शाळा व्यवस्थापन समितीदेखील सक्रिय सहभागी होत आहेत. शिक्षण प्रक्रियेतील बदल विद्यार्थी, पालक, नागरिक अशा घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर २५ ते ३० स्टॉल्स ‘गुगल लिंक’द्वारे विषयसूची व मूल्यमापनाच्या निकषांनुसार निवडावे लागणार आहेत. जिल्हास्तरीय शिक्षणोत्सवासाठी प्रत्येक तालुक्यातून निवड समितीच्या माध्यमातून ५ स्टॉल्सची निवड करून जिल्ह्यांना कळवायचे असून त्यानंतर दोन दिवसीय जिल्हास्तरीय शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन २० मार्चपूर्वी करावे लागणार आहे.

प्रत्येक तालुक्यातून निवडण्यात आलेले ५ स्टॉल्स जिल्हास्तरीय शिक्षणोत्सव उपक्रमामध्ये सहभागी होतील. जिल्हास्तरावर एकूण स्टॉल्सची संख्या ५० राहणार असून सहभागी झालेल्या स्टॉल्समधून २ स्टॉलची निवड राज्यस्तरावर होणार आहे, असे परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या विषयावर शिक्षणोत्सव साजरा होईल
* स्वच्छ विद्यालय-शाळा स्वच्छता, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन.
* किशोरवयीन आरोग्य शिक्षण, मासिक पाळी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी व हात धुण्याची सुविधा.
* शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. वाचन चळवळीशी संबंधित उपक्रम, मूल्यमापन संदर्भातील तंत्रज्ञान, अ‍ॅप व नावीन्यपूर्ण पद्धती, अध्ययन निष्पत्ती.
* सौरऊर्जा, मध्यान्ह भोजन, किचन गार्डन, ज्ञानरचनावाद, कौशल्ये, जीवन कौशल्यावर आधारित उपक्रम.
* भाषा, गणित, इंग्रजी विकास संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम.
* कला, क्रीडा, कार्यानुभव व सहशालेय याबाबतचे उपक्रम, पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठीचे प्रभावी उपक्रम, बालकांची सुरक्षितता.

- Advertisment -

ताज्या बातम्या