Sunday, May 5, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात पीक विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची लूट

राहाता तालुक्यात पीक विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची लूट

डाळिंब विम्याच्याढ भरलेल्या हप्त्यापेक्षा निम्माच परतावा; शेतकरी हतबल

पिंपरी निर्मळ (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांना डाळिंब पीक विम्याचे परतावे जाहीर झाले आहेत. यामध्ये राहाता व लोणी मंडळात एकरी साडेचार हजार तर बाभळेश्वर मंडळात 10 हजार 800 प्रमाणे परतावा देण्यात आला असून शिर्डी व पुणतांबा मंडलामध्ये विमा परतावे नाकारण्यात आले आहेत.

- Advertisement -

एकरी सव्वासात हजारांचा विमा हप्ता घेऊन साडेचार हजारांवर बोळवण केल्याने विमा कंपनीला राहाता तालुक्यात दोन कोटींचा नफा होणार असल्याने शेतकर्‍यांनी भरलेल्या हप्त्यापेक्षा निम्माच परतावा मिळाल्याने शेतकरी वर्गातून संतापाचे वातावरण आहे. एकप्रकारे कंपनीकडून शेतकर्‍यांची लूट होत असल्याचे उघड झाले आहे.

राहाता तालुक्यात 2019-20 यावर्षासाठी 5 हजार 322 शेतकर्‍यांनी तीन हजार 989 हेक्टर डाळिंब विम्यासाठी बजाज अलायन्स या पीक विमा कंपनीकडे दोन कोटी 41 लाख 36 हजारांचा शेतकरी हिस्सा भरला होता. यामध्ये राज्य सरकारने दोन कोटी 41 लाख 36 हजारांचा हिस्सा तर केंद्र सरकारने सरकारने 2 कोटी 41 लाख 36 हजारांचा केंद्राचा हिस्सा दिला होता. त्यामुळे विमा कंपनीला डाळिंबविम्याच्या हप्त्यापोटी शेतकरी, राज्य व केंद्र सरकार मिळून तालुक्यातून 7 कोटी 24 लाख 8 हजारांचा हप्ता मिळाला होता.

विमा कंपनीने विम्याचे परतावे देताना लोणी व राहाता मंडलांत एकरी साडेचार हजार रुपयांनी तर बाभळेश्वर मंडळात 10 हजार 800 रुपयांनी परतावे देऊन शेतकर्‍यांची बोळवण केली आहे. शेतकरी राज्य व केंद्र मिळून कंपनीला एकरी सव्वासात हजारांचा विमा हप्ता मिळाला आहे. लोणी व राहाता मंडलात भरलेला हप्ताही परत मिळाला नाही. शिर्डी व पुणतांबा मंडल यातून वगळण्यात आले आहेत.

त्यामुळे शेतकरी वर्गातून संतापाचे वातावरण आहे.राज्याचे महाविकास आघाडीचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातच विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची लूट झाल्याने ना. थोरात याबाबत काय कारवाई करतात याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

हवामान आधारित पीक विमा असल्याने कमीजास्त पाऊस या ट्रिगरच्या आधारावर विमा मिळतो. चालू वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या जास्त पावसाच्या आधारावर डाळिंबाचे पीक विमे मिळालेले आहेत. शिर्डी व पुणतांबा मंडलात पीक विमे अद्याप मिळालेले नाहीत.
– बापुसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी, राहाता.

- Advertisment -

ताज्या बातम्या