Sunday, May 5, 2024
Homeनगरजामखेडमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर भावना दुखविणार्‍यावर गुन्हा दाखल

जामखेडमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर भावना दुखविणार्‍यावर गुन्हा दाखल

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- मुस्लिम धर्माच्या भावना दुखावणारा मजकूर सोशल मीडियावर टाकणार्‍या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस तात्काळ अटक करण्यात आले आहे. कुठल्याही धर्माच्या भावना दुखावणारे व्हिडीओ, मजकूर सोशल मीडियावर टाकल्यास किंवा मॅसेज टाकणार्‍यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सावधान रहावे व सर्वधर्मीयांनी एकोप्याने राहून धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणीच वर्तन करू नये, अशा जाती जातीमध्ये तेड निर्माण करणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करून गुन्हे दाखल करणार असे कर्जत उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी यावेळी सांगितले.
जामखेड तालुक्यात एका व्हॉट्सअप ग्रुपवर एका व्यक्तीने मुस्लिम धर्माच्या भावना दुखावतील अशी क्लीप एका व्हाट्सअप ग्रुपवर टाकली. मुस्लिम धर्मीयांना अपमान, बदनाम करण्याच्या उद्देशाने कोरोनाव्हायरस पसरण्यात मुस्लीम धर्मीय कसे जबाबदार आहे. हे दर्शविणारा संदेश व्हिडीओ क्लिप व्हाट्सअप या सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याने मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाने कोरोना व्हायरस या साथीच्या आजारांच्या अनुषंगाने कोणीही खोट्या अफवा पसरू नये याबाबत लेखी तोंडी व सोशल मीडियावरून वारंवार आवाहन केले असताना त्याचा भंग केला आहे म्हणून व्हाट्सअप या सोशल मीडिया ग्रुपवर प्रसिद्ध करणार्‍या मोबाईल नंबर धारका विरुद्ध जामखेड पोलिस स्टेशनला अन्सार नबाब पठाण (रा. लोणी ता. जामखेड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहें.
या गुन्ह्यामध्ये दोन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध घेत असताना 5 एप्रिल रोजी जामखेड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने पोखरी (ता. आष्टी, जि. बीड) येथून एका आरोपीस पकडून त्यास ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.
अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते आहे की अशा प्रकारे आक्षेपार्ह तसेच कोणत्याही धर्माच्या या समाजाच्या भावना दुखावतील किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे संदेश व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करू नये, अन्यथा कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.
- Advertisment -

ताज्या बातम्या