Friday, May 3, 2024
Homeनगरमहसूलमंत्री थोरातांनी घेतला संगमनेरात कोरोना उपाययोजना बाबत आढावा

महसूलमंत्री थोरातांनी घेतला संगमनेरात कोरोना उपाययोजना बाबत आढावा

प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

संगमनेर (प्रतिनिधी) – देशासह राज्यामध्ये वाढत चाललेला कोरोनाचा प्रादूर्भाव त्याचप्रमाणे संगमनेर मध्ये सापडलेले 4 रुग्ण या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुक्यात कोरोणा रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांचा आढावा महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी काल घेतला.
थोरात कारखाना कार्यस्थळावर प्रशासनाच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक सोशल डिस्टन्स पाळत घेण्यात आली.

- Advertisement -

यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. हर्षल तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक परमार, पाटील, भुसारी, महाडकर, आरोग्य अधिकारी डॉ. भास्कर भवर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना नामदार थोरात म्हणाले की, राज्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अहमदनगर मध्ये काही व संगमनेर मध्ये दोन संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने 188 कलम लावले. त्यामुळे तीन दिवस नागरिकांनीही कडकडीत बंद पाळला. प्रशासनाचे काम उत्तमरित्या सुरु असून नागरिकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे.

या काळामध्ये आपण सैनिक होऊन काम करताना जास्तीत जास्त काळजीने काम करावे. याबरोबर नागरिकांनी अशा काळात घराबाहेर पडू नये, अशा काळात घरात राहून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तर यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, शहरांमध्ये जागोजागी औषधांची फवारणी केली आहे, सर्व व्यापारी, नागरिक बंधू-भगिनी यांचाही मोठा या कार्यात सहभाग मिळत आहे.

आगामी काळातही जनतेने घराबाहेर न पडता घरी थांबावे तसेच नगरपालिकेच्या वतीने अत्यावश्यक वस्तू व किराणा, भाजीपाला घरपोच देण्याची सुविधाही करण्यात आली आहे. या प्रसंगी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी तालुक्यामध्ये राबविण्यात येणार्‍या प्रभावी उपाय योजनांची माहिती नामदार थोरात यांना दिली. यावेळी अमृत उद्योग समुहाच्या वतीने ही विविध योजना राबवून प्रशासनाला सहकार्य करण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले.

नगरसेवकांसमेवत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील सर्व नगरसेवकांना समवेत त्यांच्या प्रभागात कोरोना उपाययोजनांबाबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे यशोधन कार्यालयातून चर्चा केली. यावेळेस काही अडचणी आल्यास तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन करताना यशोधन कार्यालय 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असेही नामदार थोरात म्हणाले. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व सर्व अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या