Sunday, May 5, 2024
Homeनगरआणखी 60 अहवालांची प्रतिक्षा

आणखी 60 अहवालांची प्रतिक्षा

बुधवार रात्रीअखेर 106 जण निगेटिव्ह; नगरच्या संपर्कातील बीडचा पहिला रुग्ण पॉझिटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्यावतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी बुधवारी दिवसभरात एकूण 106 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. आणखी 60 अहवालांची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी सकाळपर्यंत एकूण 83 अहवाल निगेटिव्ह आले होते. तर बुधवारी रात्री 23 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरात एकूण 106 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी एकूण 83 स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 60 जणांचे अहवाल हाती येणे बाकी आहे. बुधवारी सकाळी आलेल्या अहवालांमध्ये एक जण पॉझिटिव्ह निघाला. हा व्यक्ती मुळ बीड जिल्ह्यातील आहे. तर मूळ श्रीरामपूर तालुक्यातील एकावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांसह नगर जिल्ह्यातून एकूण बाधित संख्या 26 वर पोहचली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्यावतीने बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 873 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 250 जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे आतापर्यंत 844 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघे उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 466 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बुधवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेली आष्टी तालुक्यातील व्यक्ती आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. आष्टी येथील ही व्यक्ती आलमगीरच्या व्यक्तीची नातेवाईक आहे. त्याच्या भेटीसाठी आष्टी येथील दोघे आलमगीरला आले होते. त्यातील एकाला कोरोना संसर्ग झाला असून दुसर्‍याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

आणीबाणीसाठी 28 हजार क्वारंटाईन बेड सज्ज
जिल्ह्यातील एकूण 25 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यातील एकावर पुण्यात तर उर्वरित 24 जणांवर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या वाढल्यास जिल्हा प्रशासनाने नगर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 28 हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली आहे. यासह सध्या नगरच्या जिल्हा रुग्णालयात 12, बुथ हॉस्पिटलमध्ये 6 तर प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये 20 असे 38 खाटांचे अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्यात आले आहे.

तिसर्‍या बाधीताच्या तिसर्‍या अहवालाकडे लक्ष
जिल्ह्यातील तिसरा नगर शहरातील कोरोना बाधीत व्यक्तीचा 14 दिवसांचा क्वारंटाईनचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून आता आरोग्य विभागाला तिसर्‍या अहवालाची प्रतिक्षा आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास हा रुग्ण कोरोना मुक्त होणार आहे. या रूग्णाचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो जिल्ह्यातील तिसरा कोरोना मुक्त रूग्ण ठरणार आहे.

मंगळवारी रात्री जे अहवाल निगेटिव्ह आले, त्यात 70 जण नगर ग्रामीण भागातील असून राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, नेवासा आणि जामखेडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यासह आष्टी आणि श्रीरामपूरमधील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे. प्रवरा हॉस्पिटल आणि उत्तरेतील काही तालुक्यातील 52 व्यक्तींचा स्वतंत्रपणे पाठवलेला अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या