Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्हा परिषद मुख्यालयात थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वीत

जिल्हा परिषद मुख्यालयात थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वीत

अधिकारी, कर्मचार्‍यांसह अभ्यागतांची तापमान तपासणी सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाने लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीचेे प्रमाण 33 टक्क्यापर्यंत वाढवले आहे. तसेच प्रत्येक कार्यालयात सामाजिक अंतर तसेच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्यालयात अधिकारी,कर्मचार्‍यांसह अभ्यागतांसाठी थर्मल स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्दारे प्रत्येकाचे तापमान मोजण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

- Advertisement -

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळेे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था सुरू झालेली आहे. करोनाविरुध्दच्या लढ्यात जिल्हा परिषदेची यंत्रणा रात्रंदिवस योगदान देत आहे. विशेषत: ग्रामीण भागात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्हा परिषद संवर्गातील कर्मचारी सक्रिय आहेत. जवळपास 45 हजार कर्मचारी गावपातळीवर काम करीत आहेत.

त्याचवेळी सरकारने तिसर्या लॉकडाऊनमध्ये ऑरेंज, ग्रीन झोनमधील जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये 33 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती मंजूर केली आहे. नगर जिल्हा परिषद मुख्यालयात शासनाच्या आदेशानुसार कर्मचारी आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यालयात आरोग्य संरक्षणाच्यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात येत आहेे. अधिकारी,कर्मचार्‍यांसह अभ्यागतांचे थर्मल स्कॅनर यंत्रणेव्दारे तापमान तपासण्यात येत आहे. याशिवाय कार्यालयातही मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, हात वेळोवेळी स्वच्छ धुणे अशा उपाययोजना कटाक्षाने केल्या जात आहेत.

33 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्मचार्‍यांची 33 टक्के उपस्थिती आहे. सध्या जिल्हा परिषदेत अभ्यागतांचे येण्याचे प्रमाण जवळपास नाहीत जमा आहे. मात्र, बांधकाम विभागात ठेकेदारांची वर्दळ सुरू आहे. दुसरीकडे सर्व खाते प्रमुख नित्यनियमाने मुख्यालयात हजेरी लावत असून यामुळे काही प्रमाणात जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू आहे. आरोग्य विभागात जवळपास सर्वच कर्मचारी कामावर हजर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या