Friday, May 3, 2024
Homeनाशिकबालभारती’ची ९५ लाख ८९ हजार पाठ्यपुस्तके लॉकडाऊनमध्ये ‘लॉक ‘

बालभारती’ची ९५ लाख ८९ हजार पाठ्यपुस्तके लॉकडाऊनमध्ये ‘लॉक ‘

नाशिक : पुढील शैक्षणिक वर्ष करोनाच्या पार्श्वभूमीवर नेमके कधी सुरू होईल,हे अजूनही निश्चित नाही.अशा परिस्थितीत शाळांना पुस्तकांचा पुरवठा केव्हा करणार ? या आदेशाची प्रतीक्षा ‘बालभारती’ला आहे.

नाशिकच्या भांडारगृहात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे तब्बल ९५ लाख ८९ हजार पाठ्यपुस्तके ‘लॉकडाऊन’ झाले आहेत. लॉकडाऊनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे. परंतु, शाळा, महाविद्यालये सुरू होण्यास अजून महिना, दोन महिने अवधी लागणार असे चित्र आहे.

- Advertisement -

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य अभ्यासमंडळाची पुस्तके मोफत दिली जातात.

नाशिक जिल्ह्यात ३० लाख २४ हजार ८९३ पुस्तके वितरीत केली जातील. तसेच नाशिक शहरात ५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना बालभारतीचे पुस्तके देण्यात येणार आहेत. मात्र,करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात पाठ्यपुस्तकांचे वाटप कसे करायचे, हा सर्वात मोठा पेच बालभारतीसमोर निर्माण झाला आहे.

वाटप करण्याचे आदेश मिळाल्यास सुरुवातीला करोनाचा प्रार्दुभाव कमी असलेल्या भागात वाटप सुरू होईल. त्यानंतर ‘हॉटस्पॉट’च्या ठिकाणी पुस्तके पोहचवण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्षी साधारणत: मे महिन्यात वाटप सुरू होते आणि जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचतात.

करोनामुळे आता शाळा उशिरा उघडणार असल्याने पाठ्यपुस्तकेही पाठवण्यास उशिर होणार आहे. सोमवारी (दि.१८) लॉकडाऊनचे चौथे चरण सुरू झाले असल्याने यात भांडारगृहास पुस्तके वितरणास परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर पाठ्यपुस्तके वितरणास परवानगी मिळू शकते. भांडारगृहात सर्व पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वितरणाचे आदेश केव्हा मिळतात याकडे लक्ष लागून आहे.
-पी. एम. बागुल, भांडार व्यवस्थापक (बालभारती नाशिक)

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तके
नाशिक जिल्हा-३० लाख २४ हजार ८९४
नाशिक शहर- ५ लाख ९७ हजार ५७४
मालेगाव शहर-५ लाख ७३ हजार ३२४
धुळे-१२लाख १४ हजार ५७३
धुळे महापालिका-२ लाख ४७ हजार ८४९
नंदुरबार-१२ लाख ४ हजार २७१
जळगाव जिल्हा-२५ लाख १४ हजार ३९८
जळगाव महापालिका-२ लाख १२ हजार ५३८
एकूण-९५ लाख ८९ हजार ४१९

- Advertisment -

ताज्या बातम्या