Friday, May 3, 2024
Homeनगरजामखेड शहरात सोशल डिस्टन्सिंगची ‘ऐशी-तैशी

जामखेड शहरात सोशल डिस्टन्सिंगची ‘ऐशी-तैशी

बड्या दुकानदारांसमोर प्रशासन हतबल; छोटे दुकानदार मात्र पालन करताना दिसतात

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- नुकत्याच हॉटस्पॉटमधून बाहेर पडलेल्या जामखेड शहरात सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी होत आहे. नियमांचे लहान दुकानदार पालन करताना दिसतात पण बड्या दुकानदारांकडून ठेंगा दाखवला जात आहे. हॉटस्पॉट काळातही शहरात सर्व बंद असताना शहरातील मोठे दुकाने आतल्या दाराने दररोज सुरू होती. सर्वसामान्य व लहान दुकानेच नियमांचे पालन करत असताना बड्या दुकानदारांसमोर प्रशासन हतबल होताना दिसत आहे. नियम व अटी अनेक पायदळी तुडवल्या जात आहेत.

- Advertisement -

शहरात कापड दुकाने सुरू झाली आहेत; पण मागील दोन महिने शहरातील काही मोठी दुकाने आतल्या दाराने सुरू होती. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. शहरात बाजारासारखी मोठी गर्दी झालेली बघायला मिळत आहे. सर्रासपणे मोटारसायकलवर डबल सिट दिसत आहेत. दुकानासांठी सकाळी 9 ते दुपारी तीनची वेळ असताना अनेक दुकाने पाच वाजेपर्यंत उघडी ठेवली जातात. चौका चौकात वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे.

कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानेही 75 टक्के तीनला बंद करतात, पण 25 टक्के पाच-सहा वाजेपर्यंत सुरूच असतात. प्रशासनाने सर्वांना एकच नियम लागू करावा, अशी नियम पाळणार्‍या दुकानदारांची मागणी आहे. तसेच दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहक नसावेत, हा नियम असताना पाचपेक्षा जास्त लोक असतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.

सध्या जामखेड शहरात एकही करोना बाधित रुग्ण नाही. सध्या पुणे व मुंबई येथील अनेक लोक आपापल्या गावी आलेले आहेत. यापैकी काही लोक क्वारंटाईन आहेत; पण अनेक लोक खुष्कीच्या मार्गाने येऊन आता राजरोसपणे फिरताना दिसतात. जामखेडकरांनी दोन महिने लॉकडाउन व यातील एक महिना हॉटस्पॉट पाहिले आहे. आता प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. परत फैलाव झाला तर रोखणे कठीण होऊन बसेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या