Sunday, May 5, 2024
Homeनगरअंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्येही अशक्य ; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती

अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्येही अशक्य ; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती

समितीचा अहवाल आज सादर होण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- सायन्स, कॉमर्स, आर्ट, अभियांत्रिकी आदी शाखांतील अंतिम वर्षाच्या परीक्षा सध्याची परिस्थिती पाहता जुलैमध्ये घेणेही अशक्य आहे. यासंदर्भात नियुक्त समितीचा अहवाल आज सादर होणे अपेक्षित असून त्यानंतर बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisement -

नगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यार्थी व पालकांनी पॅनिक न होण्याचे आवाहन केले. आरोग्याचाही प्रश्न महत्त्वाचा असल्याने आरोग्य आणि विद्यार्थ्यांचे करिअर याचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल. करोना वातावरणात परीक्षा घेणे योग्य

नसल्याचे मत युजीसीने दिल्यानंतर त्यावर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली. उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण या दोन्ही खात्यांचे संचालक आणि काही कुलगुरू यांचा समावेश असलेली ही समिती आहे. समितीचा पहिला अहवाल आला. तो कॅबिनेटमंत्री उदय सामंत आणि मी सविस्तर वाचला आणि समिती सदस्यांचे म्हणणेही ऐकले.

अंतिम वर्षे वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा मागील परफॉर्मन्स पाहून गुण देण्याचे ठरले आणि त्यानुसार मार्गीही लावले. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत जूनमध्ये निर्णय घेण्याचे ठरले. तसा अहवाल पुन्हा सादर करण्याचे समितीला सांगितले. त्यावेळी जुलैमध्ये परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली होती. समितीचा अहवाल आज येणे अपेक्षित असले तरी सध्याची परिस्थिती पाहता जुलैमध्ये देखील परीक्षा घेणे अशक्य आहे.

यासंदर्भात मी देखील विविध कुलगुरू, प्राचार्य, समिती सदस्य, विद्यार्थी, त्यांचे पालक, प्लेसमेंटशी संबंधित अधिकारी यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर बोललो. या सर्वांना त्यांची मते काय आहेत, ते मागविले. यामध्ये विद्यार्थी पॅनिक असल्याचे मला जाणवले. त्यामुळे त्यांनी कोणताही तणाव बाळगू नये. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी सरकार घेईल.

आरोग्य आणि करिअर या दोन्हीही महत्त्वाच्या बाबी आहेत. अवधी लागत असला, हे जरी खरे असले तरी निर्णय होईल. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या मताशी मी व्यक्तिगत सहमत नाही. अर्थात समितीचा अहवाल आल्यानंतर सर्वानुमते ठरेल, पण ऑनलाईन सर्वांनाच सोयीचे आहे, असे मला वाटत नाही. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी खेड्यांमध्ये गेलेले आहेत. त्यांना इंटरनेट सुविधा मिळेल का, इथपासून प्रश्न आहेत. माझा विरोध आहे.

सीईटीसाठीही परिस्थिती आडवी
सीईटी कधी घ्यावयाची, यासाठीही सरकारमध्ये चर्चा झाली. यासाठी तालुकास्तरावर केंद्र (सेंटर्स) करायचे का, या पर्यायावरही चर्चा झाली. मात्र करोनामुळे सर्वत्रच परिस्थिती अवघड असल्याने याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. येथेही विविध ठिकाणची परिस्थिती आडवी येत असल्याचे ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राज्यपालांचे गैरसमज दूर
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आग्रही असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची भेट घेतली असून, यासंदर्भात त्यांची चर्चा झाली आहे. आता हा प्रश्न नाही. राज्यपालांचे असलेले गैरसमज दूर करण्यात मंत्री सामंत यांना यश आले असल्याचे ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या