Friday, May 3, 2024
Homeनाशिकमका उत्पादक मोबदल्यापासून वंचित

मका उत्पादक मोबदल्यापासून वंचित

पंचाळे । प्रभाकर बेलोटे

सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शासनाने हमी भावाने खरेदी केलेल्या मक्याच्या मोबदल्यापासून दोन महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकरी वंचित आहेत.

- Advertisement -

यावर्षीच्या करोना महामारीमुळे मक्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मागील वर्षी सुरवातीला दोन हजार रुपये क्विंटल भावाने विक्री होणारी मका मार्च-एप्रिलमध्ये हजार ते अकराशे या भावाने विक्री होऊ लागली.

बाजार समित्या अनियमित बंद चालू असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. वाढीव भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मागील वर्षीची मका साठवली होती. मात्र, रब्बी हंगामातील मका तयार झालेला असतानाही भावामध्ये वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांना मका विक्रीत मोठे नुकसान झाले.

त्यामुळे शासनाने हमी भावाने खरेदी विक्री संघामार्फत मका खरेदीची मागणी होऊ लागली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता घेऊन नाशिक जिल्ह्यातील आठ केंद्रांवर मका हमीभावाने खरेदीचे काम 1 जूनपासून सुरु झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा क्विंटल मागे सहाशे रुपयाचा फायदा झाला.

सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाकडे 1502 शेतकऱ्यांनी मका नोंदणी केली होती. अडथळ्यांची शर्यत पार करत संघाने 402 शेतकऱ्यांची 1760 रुपये या हमीभावाने 15 जुलैपर्यंत मक्याची खरेदी केली.

खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने 15 जुलैपासून मका खरेदी बंद झाली. त्यामुळे जवळपास हजार शेतकऱ्यांची मका शिल्लक होती. यानंतर पुन्हा पालकमंत्री छगन भुजबळ व दिंडोरीच्या खा. डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे पाठपुरावा केला व 23 जुलैपासून पुन्हा उद्दिष्ट वाढून घेतले. त्यामुळे संघामार्फत तिसऱ्यांदा खरेदीचे काम सुरू झाले.

सध्या संघामार्फत सिन्नर येथील तहसील कार्यालयातील गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे काम सुरू आहे.

मात्र, 15 दिवसांमध्ये मका उत्पादकांना त्यांचा मोबदला मिळेल ही शासनाची घोषणा फोल ठरली आहे. मका संघात देऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला तरीही शासनाकडून त्याचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मका खरेदीच्या रक्कमा बँक खात्यावर जमा झालेल्या नाहीत.

सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे, मजुरी, कीटकनाशके यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरातील दागिने गहाण ठेवून ऊसनवारीने व व्याजाने पैसे घेऊन हा खर्च भागवला आहे.

मका विक्रीचे हक्काचे पैसे मिळाल्यास त्यांना व्याजाने पैसे उचलण्याची गरज पडणार नाही. शासनाने मका उत्पादकांचे पैसे तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.

मी सिन्नर तालुका खरेदी विक्री संघामार्फत खरेदी केंद्रावर 2 जुलै रोजी साडेबारा क्विंटल मका दिली. अद्यापही माझे खात्यावर त्याचे पैसे शासनाकडून जमा झालेले नाहीत. खरीपाच्या पेरणीसाठी पैशाची नितांत गरज आहे. स्वत:चे पैसे असताना इतरांकडे उधार उसणवार करण्याची वेळ आली आहे.

दिलीप नारायण नरोडे, शेतकरी, पुतळेवाडी

11 जुलैपर्यंत खरेदी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते नंबर व मका खरेदीचा हिशोब तहसीलदार कार्यालयाकडे व त्यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यापूर्वीच सुपूर्द केलेला आहे. मक्याचे पेमेंट हे शासनाकडून होत असते. संघामार्फत फक्त खरेदीचे काम केले जाते.

संपत चव्हाणके, व्यवस्थापक, सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघ

- Advertisment -

ताज्या बातम्या