Friday, May 3, 2024
Homeनगरभंडारदरा ७५ तर निळवंडे ६० टक्के भरले

भंडारदरा ७५ तर निळवंडे ६० टक्के भरले

भंडारदरा |कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात गत दोन दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत असल्याने धरणात नव्याने पाण्याची जोरदार आवक होत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 6 वाजता 8587 दलघफू (77.79 टक्के) झाला होता.

- Advertisement -

काल दिवसभरात विक्रमी 357 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. पाऊस होत असल्याने विद्युतगृह क्रमांक 1 सुरू करण्यात आले आहे. त्यात 6 दलघफू पाणी खर्च झाले. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठ्याने 80 टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता.

निळवंडे धरणातही आवक होऊ लागली असून या धरणातील पाणीसाठा हलू लागला आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 5014 दलघफू (60 टक्के) होता. वाकी तलाव परिसरात जोरदार पाऊस कोसळत कृष्णवंती नदीही वाहती असून विसर्ग 1022 क्युसेकपर्यंत वाढला आहे. त्यामुळे निळवंडे धरणातही पाणीसाठा वाढत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शांत असणार्‍या पावसाने दोन दिवसांपासून उग्र रूप धारण केले असून पाणलोट क्षेत्रासह कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगा ना अक्षरशः झोडपून काढले आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे सुमारे 7 इंच तर रतनवाडी येथे 6 इंच पावसाची नोंद झाली.

त्यामुळे भंडारदरा धरणात तासागणिक पाण्याची जोरदार आवक होत आहे. श्रावणसरींचे सर्वदूर तांडव सुरू असल्याने जनजीवन गारठून गेले आहे. धुक्यांनी डोंगरदर्‍या लेपाटून गेल्या आहेत. तसेच सर्वत्र निसर्ग हिरवाईने नटल्याने सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून पावसामुळे भाताची रोपं तरारली आहेत.

मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबीत व अन्य भागात श्रावणसरींचे तांडव सुरू आहे. त्यामुळे कोतूळपासून वर मुळा नदीला पूर आला आहे. काल सायंकाळी या नदीचा विसर्ग 16375 क्युसेक होता. तर धरणात सायंकाळी 15200 दलघफू पाणीसाठा झाला होता. आज या धरणातील पाणीसाठा 60 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कोथळा तलावही ओसंडून वाहत आहे. गतवर्षी 4 ऑगस्ट 2019 मध्ये 52000 क्युसेक इतक्या विक्रमी पुराची नोंद झाली होती. गतवर्षी 5 ऑगस्टलाच 71 टक्के पाणीसाठा झाला होता.गतवर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के पाणीसाठा कमी आहे.

कुकडी, डिंभे धरण 53 टक्के भरले

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले कुकडी धरण समुहातील धरणांमध्येही पावसामुळे आवक वाढू लागली आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेले डिंभे धरणातील पाणीसाठा काल सकाळी 6563 दलघफू (53 टक्के) नोंदवला गेला. सुमारे बाराशे दलघफू क्षमतेचे वडज धरणातील पाणीसाठा 680 दलघफू (57 टक्के)होता. या दोन्ही धरणांच्या तुलनेत माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे धरणात मंदगतीने आवक होत आहे. कुकडी प्रकल्प जुन्नर, शिरूर, पारनेर, नगर, श्रीगोंदा आदी तालुक्यांना वरदान ठरलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे नियोजन याच धरणातील पाणीसाठ्यावर केले जाते. घोड धरणातही समाधानकारक पाणीसाठा आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 3405 दलघफू (57 टक्के) झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या