Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यात सात दिवसांचा लॉकडाऊन करा

राहुरी तालुक्यात सात दिवसांचा लॉकडाऊन करा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

करोना रुग्णांच्या दररोज वाढणार्‍या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राहुरी शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये पाच ते सात दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी राहुरीतील जाणकार नागरिकांतून होत आहे.

- Advertisement -

करोना महामारीने इतर ठिकाणी हाहाःकार उडविलेला असताना पहिले तीन ते चार महिने राहुरी तालुका करोना मुक्त राहिला. प्रशासनाने यासाठी मोठे कष्ट घेऊन नियोजन केले. नागरिकांनी साथ दिली. परंतु लॉकडाऊन शिथील होऊन लग्नसमारंभ व इतर कारणांनी बाहेरील आवक सुरू झाल्यानंतर मात्र, करोनाने तालुक्यात शिरकाव तर केलाच, परंतु दररोज रुग्णसंख्या वाढत आहे.

शहरासह तालुक्यात जवळपास दहाजणांचे या रोगातून बळी गेले आहेत. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर करोनाबाबत नागरिक बेफिकीर राहून काळजी घेत नाही. राहुरी बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकर्‍यांच्या व ग्राहकांच्या सोयीसाठी मोठी काळजी घेऊन बाजार समिती सुरू ठेवली. स्वतः सभापती अरुण तनपुरे यांनी लक्ष देऊन नियोजन केले. येणारी वाहने फवारणी करून सोडली जात होती.

तर व्यापार्‍यांना व खरेदीदारांना परवाने दिले गेले. येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासण्यात येत होते.परंतु एवढी काळजी घेऊनही बाजार समितीतही करोनाने शिरकाव केला. समितीचे दोन कर्मचारी बाधित निघाल्याने आता मात्र सावधगिरी बाळगावी लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दररोज ग्रामीण, शहरी भागातून नवीन रुग्ण निदर्शनास येत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून पाच ते सात दिवस लॉकडाऊन करावे, याची अंमलबजावणी नागरिकांनी स्वतःहून करून ही साखळी तोडण्याचे काम करावे लागेल, अशी मागणी शहर व परिसरातील जाणकार नागरिकांतून व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या