Friday, May 3, 2024
Homeब्लॉगनिर्णयक्षम लोकनेता

निर्णयक्षम लोकनेता

नवी मुंबई उभी राहिली त्या नव्या मुंबईतल्या जमिनी सिडकोसाठी ताब्यात घेण्याचा सगळा विषय दादा मुख्यमंत्री असताना हाताळला गेला. त्यावेळी फार मोठे आंदोलन झाले. दि. बा. पाटील त्या आंदोलनाचे नेते होते.

दादा मुख्यमंत्री होते म्हणूनच त्या काळात शेतक-याला चाळीस हजार रुपयांच्या पुढे भाव मिळाला. दादा शेतक-यांचे कैवारी होते.

- Advertisement -

राज्य कर्मचा-यांच्या संपात दादांची भूमिका कर्मचा-यांच्या ठाम विरोधात होती. संघटित लोकांना खूप फायदे मिळतात. असंघटित शेतक-याला असे फायदे मिळत नाहीत, हे दादा ठासून सांगायचे. पुढे दादांनी शेतकरी संघटना काढली. त्यासाठी ते मोर्चा काढून रस्त्यावरही उतरले.

दादा मुख्यमंत्री असताना त्यांना भाषेची अडचण कधीच आली नाही. मला इंग्रजी येत नाही, हिंदीत चांगले बोलता येत नाही, याचा संकोच त्यांना कधीच वाटला नाही. एकदा विधानसभेत चेंबूरचे जनसंघाचे आमदार हशू आडवाणी यांनी प्रश्न विचारला, ‘मुख्यमंत्रीजी, केंद्र सरकार महाराष्ट्र के लिए इतनी बडी राशी देने के बावजूद राज्य सरकार ये राशी क्यों नही उठा रही हैं..’

मुख्यमंत्री असलेले दादा उठले आणि त्यांनी सांगून टाकले, ‘अध्यक्ष महाराज, ऐसा है अंथरूण देखके पाय पसरना मंगता है..’ सारे सभागृह हसू लागले. त्यावेळचे मिश्कील आमदार केशवराव धोंडगे यांनी अध्यक्षांना विचारले, ‘अध्यक्ष महाराज हे उत्तर कोणत्या भाषेत आहे?’ दादाच उठले. आणि म्हणाले, ‘केशवराव, हशूजींकरिता हिंदीत आणि तुमच्याकरिता मराठीत. हाशूजी आपको समझा ना..’ हशूजींनी मान डोलवली.

निर्णय क्षमता हा दादांचा फार मोठा गुणविशेष होता. ते बोलत कमी. पण मनाला जे वाटेल ते लगेच कृतीत आणत. दादांना न विचारता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावर श्रीमती प्रभा राव यांची नियुक्ती श्री. राजीव गांधी यांनी करून टाकली. ही बातमी आली मात्र.. दादा मुख्यमंत्री कार्यालयातून उठले.

तडक राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी निघून गेले. कोणाला काय झाले समजायच्या आत ‘वर्षा’ हा सरकारी बंगला सोडून, मुख्यमंत्र्यांची सरकारी गाडी परत करून आपल्या बळीराम ड्रायव्हरला बोलावून दादा घरी गेलेसुद्धा. बातमी वा-यासारखी पसरली. कार्यकर्त्यांची गर्दी जमली.

रात्री राजीव गांधींचा फोन आला. राजीव गांधी समजावत होते. दादांनी स्पष्टपणे सांगितले, ‘मुख्यमंत्र्याला किमान अध्यक्षपदाचा बदल सांगून कराल की नाही? तुमची ही पद्धत मला मान्य नाही..’

आज पंचायत समितीचे सदस्यत्व कोणी सोडायला तयार होणार नाही. इथे दादांनी मुख्यमंत्रीपद सहज सोडून दिले. राजीव गांधींनी त्यांना राजस्थानचे राज्यपाल केले. त्या राज्यपाल पदातही दादा रमले नाहीत. कुठे बाहेर जायचे नाही, सरकारी कार्यक्रमांच्या बंधनात राहायचे. हे दादांना मानवत नव्हतं.

राजभवनवर लोकांना भेटायला अडचण होती. दादांनी राज्यपालपदही सोडून दिले. दादांना पदाचा लोभ कधीच नव्हता. त्यांच्या वागण्यात इतका साधेपणा होता की, त्यावेळचे सचिव दादांकडे असे बघत बसायचे. एकदा राज्यशिष्टाचार विभागाचा सचिव सांगू लागला की, ‘हरारेचे पंतप्रधान उद्या रात्री येत आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी करावे, अशी दिल्लीहून सूचना आहे.’

दादांनी विचारले, ‘हे हरारे कुठे आहे?’ मग नकाशा आणून दादांना हरारे दाखवण्यात आले. नकाशात तिथे एक ठिपका होता. दादा म्हणाले, ‘अरे हे तर सांगलीपेक्षा लहान दिसते आहे. राज्यमंत्री अजहर हुसेनना पाठवून द्या..’ आणि दादा त्या पंतप्रधानांच्या स्वागताला गेले नाहीत. दादांचे असे किती किस्से आणि त्यांचे साधेपण असे कितीतरी प्रसंगात जाणवत राहायचे. ख-या अर्थाने ज्यांना लोकनेता म्हणता येईल, असे दादा यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा, राजाराम बापू अशी विकासाचा ध्यास घेतलेली माणसे आता होणे नाही.

वसंतदादांची खरी सेवा केली ती यशवंत हाप्पे यांनी. दादांचा तोच सेवक. दादांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हा दादा म्हणाले, ‘यशवंता, आता तुला दुसरीकडे कुठे काम मिळाले, तर बघ बाबा.. तुझे नुकसान नको. ’ यशवंताच्या डोळय़ांत पाणी आले. तो म्हणाला, ‘दादा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही..’ यशवंत दादांना सोडून कधीच गेला नाही. दादांनी त्यांच्याच पुतण्याच्या लग्नमंडपात यशवंतचे लग्न करून दिले आणि त्याला जीवन जगता येईल, इतपत प्रतिष्ठेचा एक व्यवसायही उभा करून दिला. पुढे दादांची पुण्यतिथी यशवंतच दरवर्षी साजरी करण्यास कधी विसरला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या