Friday, May 3, 2024
Homeनगरमंडप, मंगल कार्यालयवाले संतापले

मंडप, मंगल कार्यालयवाले संतापले

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना संकटात शासनाने घातलेल्या अटी अजूनही शिथिल होत नसल्याने मेटाकुटीस आलेले मंडप, मंगल कार्यालयावाल्यासह संबंधित व्यावसायिक आज सोमवारी रस्त्यावर उतरले. व्यावसायाला उद्योगाचा दर्जा द्या, कर्जावर सबसिडी द्या आणि जीएसटी कमी करा यासह विविध मागण्यांचे निवेदन उत्सव सोहळे संघर्ष समितीने जिल्हाधिकार्‍यांना दिले.

कोरोना महामारीच्या काळात शासनाने बॅण्डवर बंदी घातली असून मंगल कार्यालयात 50 पेक्षा जास्त वर्‍हाडी नसेल अशी अट टाकली आहे. या व्यावसयाशी निगडीत अनेकांचा रोजगार बुडाला असून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक अडचणीत आल्याने अनेक जण मानसिक तणावाखाली आहेत. 10 मे आणि 7 सप्टेंबर रोजी शासनाला निवेदन देऊन मंगल कार्यालयात 500 वर्‍हाडींना परवानगी देण्याची मागणी केली, पण त्याचा विचार कोठेच झाला नाही. परिणामी मंडप, मंगल कार्यालय, केटरिंग, लाईट-साऊंड, फ्लॉवर, फोटोग्राफी, बॅण्ड, वेडिंग कार्ड प्रिंटर्स, पुरोहित आणि संगीत पार्टी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

- Advertisement -

शासनाने लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तत्पूर्वी सैनिक लॉन्स येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने घातलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

मंगल कार्यालयाची क्षमता पाहून किमान त्याच्या पन्नास टक्के वर्‍हाडींना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, 18 टक्के असलेला जीएसटी 5 टक्के करावा यासह विविध मागण्याचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

या आहेत मागण्या

  • कन्यादान हा संस्कार असल्याने वधू पित्याला जीएसटी परतावा मिळावा

  • कर्जधारकांचे व्याज माफ करावे, स्थिती सामान्य होईपर्यंत कर्ज हप्ता थांबवावेत

  • टेन्ट, मंडप व्यावसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा

  • टेन्ट, केटरिंग व्यावसाविकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडी मिळावी

  • टेन्ट, मंडप, मंगल कार्यालये, बॅक्वेट हॉल, लॉन्स, केटरिंग, साऊंड, लाईय डेकोरेशनला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळावा

  • शासनाने पॅकेजची घोषणा करून बँक खात्यात मदत जमा करावी

  • शासकीय कार्यक्रमत काम करणार्‍या केटरिंगधारकांचे बिल तत्काळ द्यावे

  • विविध शासकीय करातून सूट मिळावी.

यांनी धरले धरणे

मंगल कार्यालये संचालक, मंडप व्यावसायिक, घोडा-बग्गी संघटना, फोटोग्राफर, केटरिंग, लाईट अ‍ॅण्ड साऊंड संघटना, फ्लॉवर संघटना, बॅण्ड संघटना, पुरोहित संघटना,संगीत पार्टी संघटना, वेडिंग कार्ड प्रिंटर्स, डेकोरेशन संघटना.

  • शासनाकडे मागणी करूनही 50 वर्‍हाडीची अट शिथिल केली नाही. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मंगल कार्यालयाची क्षमता पाहून त्याच्या अर्ध्या वर्‍हाडींना परवानगी देणे गरजेचे आहे. कामगारांची देणी, लाईट बिल देणे कठीण झाले आहे. मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल. – राजेंद्र उदागे, अध्यक्ष, केटरिंग असोसिएशन, अहमदनगर.

- Advertisment -

ताज्या बातम्या