Friday, May 3, 2024
Homeधुळेतुटलेल्या विज तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

तुटलेल्या विज तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील फाशीपुल चौकाजवळील नवजीवन नगरात तुटलेल्या इलेक्ट्रीक तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून विज कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा बळी गेल्याची संतप्त भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शकील अल्लाउद्दीन पिंजारी, (वय-42, रा. नवजीवन नगर, फाशीपुल चौक, धुळे) असे मयताचे नाव आहे. ते ट्रकवर क्लीनर म्हणून काम करत होते. तर त्याचा भाऊ चालक म्हणून काम करतो.

आज दि. 6 रोजी फाशीपुल चौकाजवळील आई चौक मित्र मंडळाच्या बोर्डाजवळ नेहमीप्रमाणे ट्रक (क्र एमएच-18-व्हीजी-5497) हा उभा केलेला होता. रात्री हा ट्रक भावनगर येथून माल भरून गोंदूर येथे पोहचविण्यासाठी चालकाने आणला होता.

ट्रकमधील मालाची सुरक्षा म्हणून जवळ राहणारे ट्रकचे क्लिनर शकील पिंजारी हे झोपले होते. रात्रीच्या वेळी जवळच असलेल्या इलेक्ट्रीक पोलवरील वीजेची तार तुटली आणि ट्रक समोर पडली होती.

सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास शकील पिंजारी यास जाग आली. तेव्हा त्याला तुटलेली तार दिसली. रस्त्यावरून जाणार्‍यांना त्याचा शॉक लागू नये, असा विचार करीत त्याने एक लहान काठीने शकीलने तार बाजुला करण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी जवळच राहणार्‍या जयश्री कमलाकर शेलार या महिलेने शकीलला आवाज देऊन तारेमध्ये करंट असेल, हात लावू नको, असे सांगत वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तारेला आधीच पिळ असल्याने तार शकीलच्या हातावर पडली आणि जोरदार शॉक लागून शकील जागीच बेशुध्द झाला.

जयश्री शेलार यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धाऊन आले. शकील पिंजारी याला त्वरीत जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषीत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या