Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखशिक्षण यशाचा मार्ग प्रवाहित करते!

शिक्षण यशाचा मार्ग प्रवाहित करते!

समाजात विविध स्वभावाची माणसे आढळतात. त्यात काही बहुसंख्येने लक्ष वेधून घेतात. परिस्थितीला दोष देत हातावर हात ठेवून बसणारांचे प्रमाणच जास्त आढळते. अशी माणसे स्वतःच्या नाकर्तेपणाचा अनेक प्रकारे खुलासा करतात.

सरकार काहीच करत नाही, शिक्षण महागडे झाले आहे, सरकारी नोकर्‍या शिल्लकच नाहीत, योग्यते प्रमाणे काम मिळत नाही, आर्थिक परिस्थिती नाही अशा खुलाशांचे कधीही न संपणारे भेंडोळे त्यांच्याकडे असते. असे रडतराऊ जागोजागी भेटतात. तथापि काही माणसे मात्र परिस्थितीला शरण जाणे नाकारतात. प्रयत्नांची कास धरतात. आव्हानांचा सामना करण्याची ताकद कमवतात. विजिगीषू वृत्तीच्या बळावर यश खेचून आणण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करतात. कोणत्याही परिस्थितीत पराभव स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. अशीच लढवय्या वृत्ती दर्शवली आहे देविका रोटावट हिने. मुंबई बॉम्बस्फोट हल्ला खटल्यातील ती सगळ्यात छोटी साक्षीदार आहे.

- Advertisement -

या हल्ल्याला काल बारा वर्षे पूर्ण झाली. अजमल कसाब हा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील प्रमुख आरोपी होता. त्यानेच देविकावर गोळ्या झाडल्या होत्या. कसाबनेच गोळीबार केला अशी साक्ष तिने दिली. न्यायालयातही तिने कसाबला ओळखले होते. तेव्हा ती 10 वर्षांची होती. आज ती कला शाखेत पहिल्या वर्गात शिकते. मधल्या काळात तिच्या उजव्या पायावर काही शस्त्रक्रिया झाल्या. दीर्घकाळ करावे लागलेले उपचार, वडिलांचा बंद पडलेला व्यवसाय, त्यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थिती, मोठ्या भावाचे आजारपण, त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रिया अशा अनेक आव्हानांचा सामना ती करत आहे. पण यातील कोणतीही गोष्ट तिला तिच्या ध्येयापासून दूर करू शकली नाही. भारतीय पोलीस दलात काम करणे हे तिचे ध्येय आहे. ’माझे खूप कौतुक आणि सत्कार झाले. आर्थिक मदतही मिळाली. पण आता माझ्या समस्या मलाच सोडवायच्या आहेत. त्यासाठी शिक्षण घ्यायचे आहे’ अशा भावना तिने माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. आव्हानांशी भिडणारी अशी अनेक उदाहरणे समाजात आढळतात. ऑक्सफर्ड इन्स्टिटयूटने करोनावर लस विकसित केली आहे.

प्रा. कॅटी इव्हर त्यापैकीच एक! तिला वैद्यकीय शाखेत जायचे होते. पण गुण कमी पडले. प्रवेशाची संधी हुकली. पण त्या जीवशास्त्र विषय घेऊन मायक्रोबायॉलॉजिस्ट झाल्या. त्या संसर्गजन्य रोगांचा अभ्यास करतात. त्यांनी मलेरिया लसीवर 13 वर्षे संशोधन केले आहे. सारा गिलबिर्ट या दुसर्‍या शास्त्रज्ञ. यांना वैद्यकीय संशोधनाचा 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी फ्लूवर लस तयार केली आहे. त्यांना तिळे झाले. त्या तीन मुलांच्या संगोपनाबरोबच त्यांनी संशोधनाचे कामही सुरूच ठेवले आहे. या शास्त्रज्ञांना परिस्थितीवर मात करण्याचे बळ शिक्षणातून मिळाले. देविकानेही शिक्षण सुरु ठेवण्याचा निवडलेला मार्ग बरोबर आहे. शिक्षण माणसाला आव्हानांवर मात करण्यासाठी प्रेरणा आणि बळ देते. तथापि शिक्षण हे अंतिम शिखर नव्हे, हे देविकालाच नव्हे तर आयुष्यात यशस्वी होण्याचे ध्येय बाळगणार्‍या तरुणाईला लक्षात घ्यावे लागेल. शिक्षणाचा व्यवहारात उपयोग कोण किती प्रमाणात आणि कसा करून घेतो त्यावर यश अवलंबून असते हे विसरून चालणार नाही. शिक्षण असो वा संशोधन. मिळवलेल्या ज्ञानाला व्याव्हारिकतेची जोड देऊ शकतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. ऑक्सफर्डमधील शास्त्रज्ञ हे त्याचे उदाहरण आहे.

व्यावहारिक कौशल्याअभावी शिक्षण कुचकामी ठरू शकते. पीएचडी पंडित कितीतरी असतात. हजारो विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेतात. विविध पात्रता परीक्षाही शेकडो जण उत्तीर्ण होतात. पण खर्‍या अर्थाने त्यातील किती जण यशस्वी होतात? 2030 मध्ये भारतातील लाखो सुशिक्षित तरुण कौशल्याअभावी नोकरी मिळवण्यास अपात्र ठरतील असा अंदाज युनिसेफ या संस्थेने वर्तवला आहे. त्यामुळे शिक्षण हा यशाचा मार्ग, त्याचे विविध टप्पे, दाखवणारा प्रकाश आहे. त्याचा व्यावहारिक उपयोग करण्याची संधी मिळाली पाहिजे. तिचे सोने करता आले पाहिजे. त्याची पूर्वतयारी म्हणून शिक्षणाकडे पाहिले जावे. त्याच पायरीवर अडकून राहून कसे चालेल? यशाला कोणतीही एकच पायरी अपुरी असते. शिक्षण, प्रयत्न, सातत्य, संधी, संधीचे सोने अशा अनेक पायर्‍या चढत जावे लागते तेव्हाच यशाचे शिखर गाठता येते. पण त्यासाठी शिक्षण हवेच हे देविकाला उमगले आहे.

शिक्षणाअभावी बरीच माणसे दैववादी बनतात. आपले ओझे देवावर ठेवण्याचा प्रयत्न करतात. करनापुरते तरी काही ठिकाणी असेच चालल्याचे जनतेच्या अनुभवास येते. काल कार्तिकी एकादशी साजरी झाली. खरे तर पंढरपूरचा विठोबा हा बिननवसाचा देव आहे असे म्हणतात. तथापि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने त्यालाही अनेकांनी करोना हद्दपार करण्याचे साकडे घातले. देविकाने मात्र प्रयत्नांची आणि शिक्षणाची कास धरण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. तो निर्धार कौतुकास्पद आहे. शिकता शिकता त्याचा व्यावहारीक उपयोग करण्याचे कौशल्य विकसित करणे आणि संधीचे सोने करणे हाच यशाचा मार्ग आहे. हे यशप्राप्तीसाठी धडपडणार्‍या तरुणाईने लक्षात घेतलेले बरे!

- Advertisment -

ताज्या बातम्या