Friday, May 3, 2024
Homeराजकीयकेंद्र सरकारने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा

केंद्र सरकारने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा

मुंबई | Mumbai

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाचार घेतला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे विधान गांभीर्याने घेत केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तान यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करावा असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे”.

तसेच केंद्र सरकारने कृषी कायद्यांची अंमलबजावणी प्रथम भाजपशासित राज्यांमध्ये करावी. त्यानंतर या कायद्यांचा काय परिणाम होतो हे पाहून पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारला तोडगा काढणे शक्य होते. मात्र, केंद्र सरकारला हा विषय अधांतरी ठेवण्यातच रस आहे. बिहारमध्ये कृषी कायद्यासारख्या सुधारणा झाल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे सध्या बिहारमध्ये धान्याचा भाव 900 रुपये इतका आहे, तर पंजाबमध्ये हाच भाव 1500 रुपये इतका आहे. मग आता बिहारमधील शेतकऱ्यांनी धान्य विकण्यासाठी पंजाबमध्ये जावे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल – राज्यमंत्री बच्चू कडू

दानवेंच्या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. “सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते दानवे?

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा काल (बुधवार, 9 डिसेंबर 2020) पार पडला. या सोहळ्याला रावसाहेब दानवे हजर होते. या वेळी बोलताना देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक विधान केले. रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे. ‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या