Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामध्यवर्ती कारागृह करोना मुक्तीकडे

मध्यवर्ती कारागृह करोना मुक्तीकडे

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

गेल्या काही दिवसापासून करोनामुळे भयग्रस्त झालेल्या येथील मध्यवर्ती कारागृहाची वाटचाल आता करोनामुक्तीच्या दिशेने होत असून कारागृह प्रशासन व बंदीवानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

- Advertisement -

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कारागृह म्हणून ओळखले जाते. या कारागृहात अनेक प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारे सुमारे 2000 पेक्षा जास्त कैदी आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून करोनामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यात कारागृहातील कैदी व कर्मचार्‍यांचाही सामावेश आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर व नाशिकरोड येथे मध्यवर्ती कारागृह आहेत. या कारागृहात विविध प्रकारचे गुन्हे असलेले असंख्य कैदी शिक्षा भोगत आहेत.

करोना कालावधीत या सर्व कारागृहांमध्ये कैद्यांना व काही कर्मचार्‍यांना लागण झाली होती. त्यात नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहाचासुद्धा समावेश आहे. येथील मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपूर्वी अनेक कैदी व कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे कारागृह प्रशासन हतबल झाले होते. या महामारीचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून कारागृह प्रशासनाने तातडीने पावले उचलून कारागृहाच्या बाजूला असलेल्या के.एन. केला स्कूलमध्ये तात्पुरते कारागृह उभारले. अद्यापही हे कारागृह असून या ठिकाणी नव्याने येणार्‍या व साधारण शिक्षा असलेल्या कैद्यांना ठेवले जाते. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने अनेक कैद्यांच्या शिक्षेमध्ये सूट देण्यात येऊन त्यांना सोडण्यात आले. त्यात येथील मध्यवर्ती कारागृहाच्या काही कैदयांचा समावेश आहे.

दरम्यान, करोना रोखण्यासाठी येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन शासनाच्या नियमानुसार काम केले. अजूनही कारागृहामध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सर्व नियम कसोशीने पाळले जातात. त्यामुळे कारागृहातील करोना कैद्यांची व कर्मचार्‍यांची संख्या कमी झाली. आता येथील मध्यवर्ती कारागृहात सध्यातरी कोणत्याही प्रकारचा कैदी अथवा कर्मचारी करोनाग्रस्त नसल्याने एक प्रकारे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह करोनामुक्त झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारागृहातील कैदी, कर्मचारी व प्रशासनाने आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कारागृहात सध्या कोणताही कैदी अथवा कर्मचारी करोनाग्रस्त नाही. शासनाचे सर्व नियम काटेकोर पाळले जातात.

-प्रमोद वाघ, नाशिकरोड कारागृह अधीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या