Friday, May 3, 2024
Homeनाशिकइगतपुरी : शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी तालुक्याच्या आशा पल्लवित

इगतपुरी : शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी तालुक्याच्या आशा पल्लवित

घोटी । Ghoti (वार्ताहर)

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे विधान परिषदेसाठी पक्षाकडून नाव सुचवले गेल्याने शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुखपदासाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे. या हालचालीत इगतपुरी तालुक्याच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisement -

नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहणार्‍या इगतपुरी तालुक्याला जिल्हाध्यक्षपदाची अर्थात पक्षात जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा अनेक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.

तीन-चार दशकांपासून इगतपुरी तालुका आणि शिवसेना यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. तालुक्याच्या मतदारसंघाच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही खेडोपाडी, वाड्या-पाड्यांवर शिवसेना मूळ रोवून आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था, नगरपरिषदस्तरावरही शिवसेनेने आपली पकड कायम ठेवली आहे.

त्यामुळे शिवसेनेला बळ देण्यात इगतपुरी तालुका नेहमीच अग्रेसर असतो. नाशिक ग्रामीण शिवसेना जिल्हाध्यक्षपदासाठी ग्रामीण भागाला अर्थातच इगतपुरी तालुक्याला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शिवसैनिक बाळगून आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरी नगरपरिषद, इगतपुरी पंचायत समितीवर शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेचे पाचपैकी चार गट शिवसेनेच्या ताब्यात आहेत. अन्य एका गटातील गावामधूनही शिवसेनेने विजय संपादन केला आहे. याचवेळी नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

इगतपुरी तालुक्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्याकडे संघटन कौशल्य व सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने त्यांच्या रूपाने इगतपुरी तालुक्याला शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपद अपेक्षित आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी निभावणारे व पक्षास अपेक्षित पद मिळवून देणारे अशी त्यांची ओळख आहे. पंचायत समिती पदाधिकारी, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अशा महत्त्वाच्या जबाबदार्‍या व संघटनात्मक कार्य त्यांनी यशस्वी पार पाडले आहे.

तसेच गतवेळी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदाच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव अग्रस्थानी असते. परंतु ऐनवेळी इगतपुरी तालुक्याला वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत ठेवले जाते.

त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा वजा मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या