Friday, May 3, 2024
Homeब्लॉगBlog : कलेच्या उपासकाची सेवापूर्ती

Blog : कलेच्या उपासकाची सेवापूर्ती

नाशिक | प्रतिनिधी

आपल्या कलेने माणूस नेहमी लक्षात राहतो, याच कलेचे उपासक… कला शिक्षक प्रकाश तुकाराम जाधव अर्थात पी.टी. जाधव सर. आज ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत….

- Advertisement -

मराठा विद्या प्रसारक नाशिक या संस्थेत आपल्या कलेच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेले हे कलेचे उपासक पुंडलिक भिमाजी कथले विद्यालय, मिठसागरे, ता. सिन्‍नर या विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

पी.टी. जाधव यांचे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते. निफाडजवळील सावरगाव हे त्यांचे गाव. पुढे नैताळे या ठिकाणी स्थायिक झाले. कलेत आवड असल्यामुळे ए.टी.डी., जी.डी.आर्ट व ए.एम. हे शिक्षण घेऊन, वैनतेय हायस्कूल, निफाड या विद्यालयातून आपल्या सेवेला सुरुवात करुन मग मविप्र संस्थेच्या कोठुरे, सिन्‍नर, ओझर, मनेगाव, सोनांबे, डुबेरे, नामपूर व मिठसागरे या शाखेत आपली सेवा केली.

एक कलाशिक्षक म्हणून जाधव सरांनी ज्या ज्या शाळेंवर सेवा केली, त्या शाळेचे रंगरुप बदलून टाकले. त्यामागे त्यांना उपजत मिळालेले कलेचे वरदान होय. विद्यालयात अध्यापनाबरोबरच प्रासंगिक फलकलेखन संस्काराचे केंद्र बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचे कसब सरांकडे होते. दिनविशेष असलेल्या समाजसुधारक किंवा स्वातंत्र्यसेनानीचे रंगीत खडूने रेखाटलेले आकर्षक चित्र रेखाटन सर्वांसाठी आकर्षण ठरायचे.

मविप्रच्या मनेगाव येथील शाळेत त्यांची बदली असताना तेथील परिपाठ अतिशय ताला-सुरात होत असे. समूह गायनाच्या स्पर्धा असोत किंवा राष्ट्र सेवा दलाच्या स्पर्धा, शाळेला अग्र पारितोषिकांचं मानकरी होता आलं. याचं श्रेय जाधव सरांचंच. कलेबरोबरच संगीताची सरांना खूप आवड.

पेटी, तबला, गिटार ही सर्व वाद्ये ते अगदी सहज हाताळत असत. त्यांना मूर्तीकलेचेही ज्ञान होते. मुखवटे तयार करताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव अतिशय रेखीव असायचे. सरांना राष्ट्रीय महापुरुषांविषयी जाज्वल्य अभिमान असल्याने जाधव सरांनी केलेले फलकलेखन आकर्षक, परिणामकारक, संस्कारक्षम, मार्मिक, बोधप्रद व आत्मचिंतनास भाग पाडणारे असेच असते.

छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, लाल बहादूर शास्त्री, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा गांधी, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राष्ट्रसंत गाडगे महाराज, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर वसंतराव पवार, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार या आणि यांसारख्या विविध क्रांतिकारकांचे रंगीत खडूने काढलेल्या फलकावरील प्रतिमा आजदेखील नजरेसमोर उभ्या राहतात.

संस्थेतील संस्थापकांचे रंगीत फोटो, संस्थेची कार्यपुस्तिका व प्रयोगवहयांचे मुखपृष्ठ तसंच आदर्श फलकलेखन, बोलक्या भिंती, गरीब मुलांना उदार हस्ते मदत, चित्रकलेच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी स्वतःला झोकून देणे हे सर्व कार्य सरांनी आपल्या शिक्षक सेवाकाळात केले आहे. आज सरांचा सेवापूर्ती कार्यक्रम, त्यासाठी सरांना पुढील आयुष्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

पी.आर. करपे विज्ञान शिक्षक, जनता विद्यालय डुबेरे

- Advertisment -

ताज्या बातम्या