Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या732.71 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

732.71 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात करोना उतरणीला लागला असून आता विकासकामांवर भर द्या, असे आदेश देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सन 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याच्या 732 कोटी 71 लाखांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली. आताच्या आराखड्यात 200 कोटींची वाढ करण्याचे आदेश देत तसे प्रस्ताव देखील संबंधित यंत्रणांनी सादर करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे शासनाकडे 200 कोटींच्या वाढीसह एकूण 924 कोटीचा आराखडा मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे भुजबळ यांंनी सांगितले.

- Advertisement -

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.30) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी चालू आर्थिक वर्षाच्या विकास आराखडा सादर केला. करोना संकटामुळे मागील वर्षात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नाही. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने मागील वर्षाच्या अखेरीस निधी प्राप्त झाला. त्यातही ग्रामपंचायत निवडणूक आचार संहितेमुळे त्याचा खर्च करण्यास जानेवारी उजाडला. त्यामुळे अपेक्षित खर्चही होऊ शकला नाही.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी करोना अद्याप संपला नसल्याने काळजी घ्या, पण आता करोनाचे कारण देऊ नका. पुढील बैठकीत तुम्ही केलेल्या कामांचीच प्रथम माहिती घेतली जाईल. ही बैठकही वर्ष किंवा दोन- दोन वर्षांनी न होता नियमित 3 ते 4 महिन्यांतच होईल. त्यामुळे करोना काळातील कामांची तुट भरुन काढा. कामाला लागा, असा सूचनावजा इशाराही यावेळी दिला. सदस्यांनी मांडलेल्या शाळा खोल्या दुरुस्ती, नवीन बांधणी, आरोग्य केंद्र सोयी सुविधा उपलब्धी, विजेचे प्रश्न, ट्रान्सफार्मची समस्या असे सारंच निकाली काढण्याचेही आदेश दिले.

कृषीमंत्री दादा भुसे यांनीही विज कंपनीने शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेत त्यांना सेवा द्यावी, असे आदेश दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पीएचसी केंद्रांवर विज हवी, दुरुस्ती करावी. कर्मचारी, डॉक्टरांच्या उपलब्धीसह सोयी सुविधा द्या. शाळा खोल्या त्वरीत दुरुस्त करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, अ‍ॅड. राहुल ढिकले, सरोज आहेर, दिलीप बनकर, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, उमाजी बोरसे, हिरामण खोसकर, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदींसह अधिकारी, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

करोनाचे संकट टळले असा गैरसमज करून चालणार नाही. परंतु आता विकासकामांकडे लक्ष द्या. मोठ्या प्रमाणात अखर्चित निधी खर्च करा. यंदाच्या चालू वर्षासाठी 732.71 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण शासनाकडे आपण आणखी 200 कोटी जादाची मागणी करणार असून संबंधित यंत्रणांनी तसे प्रस्ताव सादर करावे.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

67 टक्के निधी खर्च करण्याचे आवाहन

गत आर्थिक वर्षात 824 कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 340 कोटी 54 लाखांचा निधी उपलब्धही झाला. यातील 167 कोटी 58 लाख यंत्रणांना वितरित केले. त्यापैकी 145.74 कोटी म्हणजे 42.79 टक्के इतकाच खर्च झाला आहे. पुढील 60 दिवसांत 67 टक्के निधी खर्च करण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे.

2021-22 साठीचा आराखडा

सर्वसाधारण योजनांसाठी 348.86 कोटी

आदिवासी योजनांसाठी 283.85 कोटी

अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 100 कोटी

- Advertisment -

ताज्या बातम्या