Sunday, May 5, 2024
Homeनगरआम्ही सरकार चालवू, तुम्ही गाडी चालवा : खा. आठवले

आम्ही सरकार चालवू, तुम्ही गाडी चालवा : खा. आठवले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते.

- Advertisement -

त्यामुळे लोकशाही आणि संविधानही धोक्यात येईल, अशी भीती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री सरकारसोबत गाडीही चालवितात. यामुळे मला वाटते, त्यांना कार चालविण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा, सरकार आम्ही चालवू असा टोला खा. आठवले यांनी त्यांना लगावला.

खा. आठवले शनिवारी रात्री उशीरा नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी आठवले म्हणाले, उद्योजक अदानी आणि अंबानी यांचा कृषी कायद्यांशी संबंध जोडणे चुकीचे आहे. त्यांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने हे कायदे केले, हा दावाच चुकीचा आहे.

अदानी आणि अंबानी यांचे व्यवसाय वेगळे आहेत. ते कृषीमालावर अवलंबून नाहीत. शिवाय या कायद्यामुळे ते कृषी मालाच्या खरेदीला येतील, असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसर्‍यांदा सत्तेत आले आहेत, त्यामुळे ते अशा कोणाच्या फायद्यासाठी कायदे करतील असे होणार नाही.

प्रजासत्ताकदिनी घडलेल्या हिंसाचाराबद्दल आठवले म्हणाले, 26 जानेवारीला शेतकरी आंदोलकांना दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी द्यायला नको होती. दिल्ली पोलिसांनी ती दिली. त्यामुळेच त्याचे स्वरुप बिघडून हिंसाचार झाला. मात्र, यासाठी भाजपला जबाबदार धरणे चुकीचे आहे. आंदोलन मिटविण्यासाठी सरकारने बारा बैठका घेतल्या. मात्र, तोडगा काढायचा नाही, अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालाचा आदेश आल्यावर तरी ऐकायला हवे होते. मात्र, आंदोलन वाढवतच नेले जात आहे. नामांतरासारख्या संवेदनशील विषयावर आम्हीही आंदोलने केली. मात्र, लोकांना वेदना होतील असे कधीही वागलो नाही. हे शेतकर्‍यांचे आंदोलन मात्र चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे खा. आठवले म्हणाले.

राज्यपाल विमान प्रवास विषयावर ठाकरे सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि पर्यायाने लोकशाहीचा अपमान झाला आहे. सरकारने अशा पध्दतीने राज्य सरकारने सुड उगारायला नको होता. विमान कोणाची जहागिरी नसून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात माफी मागायला हवी. विधानपरिषदेच्या 12 जागांना मान्यता देण्यास उशीर होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मात्र, हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने ठरलेल्या कॉटेगिरीनूसार निवड होणारे आमदार पात्र आहेत की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. यामुळे निवडीला उशीर होत असेल. अशी चर्चा आहे की ठाकरे सरकार जावून भाजपचे सरकार येईल. मात्र, असे काहीही होणार नाही. राज्यात ठाकरे सरकार असून ते सरकारसोबत कारही चालवितात. यामुळे कार चालविण्याकडे अधिक लक्ष द्यावे, सरकार आम्ही चालवून, असा टोमणा खा. आठवले यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या