पुणे (प्रतिनिधि) –
प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या आईचा प्रेयसीच्या संगनमताने खून केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील हवेली
तालुक्यातील वढु खुर्द येथे घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी आईचा खून दूसरा कोणीतरी केल्याचे भासवून खुनाची फिर्याद देणाऱ्या मुलाला आणि प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे.
सुशिला राम वंजारी (वय ३८, रा. मानेवस्ती वढु खुर्द (ता.हवेली) असे खून झालेल्या आईचे नाव आहे तर विशाल राम वांजारी (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव तर नॅन्सी गॅबरियल डोंगरे (वय २६) असे त्याच्या प्रियसीचे नाव आहे. या खूनाची फिर्याद देणारा मुलगाच खुनी निघाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राम वंजारी यांने प्रेयसी नॅन्सी गॅबरियल डोंगरे हीच्याशी संगनमत करून प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सुशिला यांनी १५ हजार ५०० चोरले म्हणून भांडण केले. रागाच्या भरात त्याने सुशिला यांचा सोमवारी पहाटे धारदार शस्त्राच्या साहाय्याने खून केला. घटनेनंतर स्वत: पोलिस ठाण्यात जात विशालने आईच्या खुनाची फिर्याद दिली. तसेच शिवा देशमुख नावाच्या एक व्यक्ती खून करून फरार झाल्याचे खोटे सांगितले. पोलिसांनी वारंवार त्याच्याकडून जबाब घेतल्याने त्यात पोलिसांना तफावत आढळली. यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच आईचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या कबुली जबाबानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.