Sunday, May 5, 2024
Homeनाशिकअद्याप जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही

अद्याप जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही

नाशिक । Nashik

यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे मार्च महिना संपत आला तरी अद्याप जिल्ह्यात एकही टँकर सुरू झालेला नाही. अजूनही साधारणत: पुढील दीड महिना टँकरची आवश्यकता भासणार नाही. दरम्यान , वार्षिक नियोजनानुसार पाणी पुरवठा विभागाने 11 कोटी 19 लाख 77 हजारांचा टंचाई आराखडा तयार केलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरी 150 टक्क्यांपर्यंत झालेले आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा कमी जाणवत आहेत. विशेष म्हणजे नांदगाव, सिन्नर, मालेगाव, चांदवड या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अजूनही मुबलक पाणी आहे.

त्यामुळे या तालुक्यांमधून टँकरची मागणी झालेली नाही. तसेच त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी बहुल तालुक्यांमधील काही भागांत टँकरची मागणी होत असते. परंतु, येथेही पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातून यंदा टँकरची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.

वार्षिक नियोजनाचा भाग म्हणून पाणी पुरवठा विभागाने 604 गावे आणि 718 वाड्यांसाठी टंचाई आरखडा तयार केला आहे. मे महिन्यात या गावांसाठी 210 टँकरची आवश्यकता भासू शकते. त्याद़ृष्टीने टंचाई आराखड्याचे नियोजन केले असून, विंधन विहिर, नळयोजना दुरुस्ती, विहीर खोलीकरण आदी उपाययोजनांचा समावेश केला आहे.

गतवर्षी मार्चमध्येच टँकरची मागणी

गेल्यावर्षी मार्च महिन्यातच टँकरची मागणी झाली होती. त्यानुसार प्रशासाने नियोजन करुन टँकर सुरूदेखील केले होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने टंचाईच्या उपाय योजनांपासून पाणी पुरवठा विभागाची सूटका झाली आहे. टंचाई आराखड्यातील निधीही यंदा पूर्ण खर्च होणार नसल्याचे दिसते.

- Advertisment -

ताज्या बातम्या