Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, शिक्षणमंत्री म्हणाल्या...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, शिक्षणमंत्री म्हणाल्या…

मुंबई

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोनामुळे १० वी आणि बारावीचे जे विद्यार्थी ठरलेल्या तारखेला परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या अशी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. यामुळे, अनेकजण चिंतेत होते. आता त्यासंदर्भात नवीन खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

काय असणार नियम

स्वतः किंवा कुटुंबातील कुणी कोरोना बाधित असेल आणि जे विद्यार्थी इयत्ता दहावी किंवा बारावीच्या परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मोठा खुलासा झाला आहे. एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

या तारखेदरम्यान परीक्षा

इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षेचे त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेतील परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.

लेखी परीक्षेसाठी वेळ

लॉकडाऊनमुळे लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या