Friday, May 3, 2024
Homeनगरबेलापूर रस्ता चौपदरीकरणाचे टेंडर करोनात अडकले

बेलापूर रस्ता चौपदरीकरणाचे टेंडर करोनात अडकले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मागविण्यात आलेल्या ई निविदा (टेंडर) करोना माहामारीत अडकल्या आहेत. आता येत्या 15 एप्रिलनंतर या निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोपरगाव झगडेफाटा ते राहुरी फॅक्टरी दरम्यानच्या राज्य महामार्ग क्रमांक 36 चे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या राज्यमार्गाच्या कामासाठी श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील वेस ते बेलापूर (कोल्हार चौक) पर्यंच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. पहिल्या दोन किलोमिटरसाठी 6 कोटी निधी मंजूर असताना दुसर्‍या टप्यासही मंजुरी मिळाल्याने हे काम लवकरच सुरु करण्यासाठी ई निविदा (टेंडर) मागविण्यात आल्या आहेत.

दि. 30 मार्च रोजी या निविदा उघडल्या जाणार होत्या मात्र सार्वजनिक बांधकाम विभागात करोनाने शिरकाव केल्याने या निविदा उघडणार्‍या समितीमधील अधिकारीच करोनाबाधीत झाले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया 15 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता येत्या 15 एप्रिलनंतर या निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान हे काम करण्यासाठी रस्त्यालगचे अतिक्रमण अडचणीचे असल्याने या अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुंनी प्रत्येकी 15 मिटर (45 फूट) अंतरातील अतिक्रमणे काढली जाणार आहेत.

नोटिसा मिळाल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी आपली दुकाने मागे सरकविली आहेत. तर काही जण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. त्यात काहींनी केवळ पाच-सहा फूट दुकाने मागे सरकवली असली तरी नियमानुसार 15 मिटर अंतरातील सर्व अतिक्रमणे काढली जाणार असून शासकीय यंत्रणेमार्फत काढलेल्या अतिक्रमाचे साहित्य बांधकाम विभागाच्या गोडावून मध्य जमा केले जाणार आहे.

तसेच हे अतिक्रमण काढण्यासाठी होणारा खर्चही अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जाणार आहे. तरी संबधितांनी कारवाईची वाट न पाहता स्वतः अतिक्रमण काढून सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या