Friday, May 3, 2024
Homeनगरजादा बिले आकारल्यास कारवाई - तहसीलदार हिरे

जादा बिले आकारल्यास कारवाई – तहसीलदार हिरे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

करोना संदर्भातल्या अटी व शर्ती पाळल्या नाहीतर कडक कारवाई करण्याचा इशारा राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

कोणत्याही खाजगी लॅबमध्ये तपासणी करताना किंवा दवाखान्यामध्ये कोणी ठरवून दिलेल्या बिलापेक्षा रुग्णांकडून जादा आकारणी केली तर तशी तक्रार संबंधित रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी करावी, त्या दवाखान्यावर किंवा लॅबवर सक्त कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.

राहाता तालुक्यामध्ये करोना बाधितांची संख्या मोठी झपाट्याने वाढत असल्यामुळे करोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे स्वतः राहाता तालुक्यात रात्रंदिवस प्रयत्न करीत असून काल शिर्डीत स्वतः फिरून शिर्डीतील अनेक हॉटेल, लॉजिंग, दवाखाने, लॅब मध्ये जाऊन त्यांची तपासणी केली. येथे करोना संदर्भातल्या अटी व शर्तींचा भंग होतो की काय? याची पाहणी केली तसेच करोनाबाबत अटी व शर्तीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या.

जिल्ह्यामध्ये राहाता तालुक्यात करोना बाधितांची संख्या मोठी असल्यामुळे तालुक्यामध्ये सहा ठिकाणी खाजगी 100 बेडचे करोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी किंवा खाजगी दवाखान्यात रुग्णांकडून अधिक बिले आकारू नयेत, त्याचप्रमाणे खासगी लॅबमध्ये करोना तपासणी केली जाते. त्या संदर्भातही लॅब वाल्यांनी अधिक बिले घेऊ नयेत, शासनाने ठरवून दिलेल्या बिलात किती रक्कम रुग्णांकडून आकारली तेवढीच घ्यावी, अन्यथा अशा खाजगी दवाखाने किंवा लॅबवर शासनामार्फत सक्त कारवाई करण्यात येईल, असाही इशारा तहसीलदार हिरे यांनी दिला आहे.

नागरिकांनीही बाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे, तसेच सामाजिक दुरीचे अंतर ठेवले पाहिजे, दुकानदारांनी मास्क वापरून सामाजिक दुरीचे अंतर ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा दुकानदारांवर ही दुकाने बंद करण्यासारखे पाऊल उचलले जाईल रात्री आठ नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीचे जमावबंदी आदेश लागू आहेत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये तसेच लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर समारंभांसाठी गर्दी करू नये.

राहाता तालुक्यातील सर्व नागरिकांनी अटी व शर्ती यांची काटेकोर अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर नाईलाजाने कडक कारवाई केली जाईल. यापुढे कोणीही असो करोनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या