Sunday, May 5, 2024
Homeनगरगट सचिवांना मिळणार विमा संरक्षणाचे कवच

गट सचिवांना मिळणार विमा संरक्षणाचे कवच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 1 हजार 391 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सहकारी बँक व शासनाची जिल्हास्तरीय समितीने पुढाकार घेतला असून या दोघांच्या ‘स्व’ खर्चातून विमा रक्कम भरण्याचा निर्णय बँकेच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली.

- Advertisement -

करोना महामारीमुळे अनेक गट सचिवांना संसर्ग झाला असून यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने सभासद शेतकर्‍यांची पिक कर्जासाठी प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे सचिवांचा जनतेशी मोठ्या प्रामणावर थेट संपर्क येत असून त्यामुळे करोना संक्रमणाचा धोका आणखी वाढला असल्याने बँकेच्या संचालक मंडळाने गट सचिवांना विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामूळे काही सचिव मयत झालेले आहेत. तसेच सचिवांना इतर कोणत्याही शासकीय सुविधा नसल्याने याच विचार करून जिल्हा बँक 50 टक्के व शासकीय जिल्हास्तरीय समिती यांनी 50 टक्के सहभागातून प्रत्येक सचिवाचा आरोग्य विमा उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायट्या सचिवांसाठी हा आरोग्य विमा लागू आहे. या विम्याचा धनादेश बँकेने जिल्हास्तरीय समितीकडे सुपूर्त केला असून जिल्ह्यातील जवळपास 756 सचिवांना त्वरित लाभ होणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे सदस्य रावसाहेब वरपे यांनी दिली. या विमा पॉलिसीची विस्तृत माहिती देताना जिल्हा उपनिबंधक आहेर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरपे यांनी सांगितले, जिल्हास्तरीय समितीच्या खात्यातून विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीस चेकद्वारे पाठविली आहे. त्यामुळे सचिवांना विमा कवच लागू झाले आहे.

योजनेत गट सचिवांना दोन लाखांचे विमा कवच राहणार आहे. या विमा योजनेत जिल्हास्तर व तालुका स्तरावरील महत्वाच्या सर्व हॉस्पिटलचा समावेश असून कंपनीच्या यादीतील सर्व हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या यादीतील हॉस्पिटल व्यतिरिक्तही उपचार घेतल्यानंतर विम्याची रक्कम परत मिळणार आहे. गटसचिवांनी करोनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक खबरदारी घेऊन कामकाज करावे. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. लक्षणे दिसताच वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या