Friday, May 3, 2024
Homeनगरसुपा मंडळ अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई

सुपा मंडळ अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई

सुपा (वार्ताहर)

सुपा येथील मंडळ अधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांच्याकडे मेडिकल ऑक्सिजन टॅकर भरून विनाअडथळा नगरला पोहचविण्याची जबाबदारी होती.

- Advertisement -

Video : लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

मात्र, करोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामात हलगर्जीपणा करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यासह करोना काळात कामात आणि नियुक्ती दिलेल्या कोविड सेंटरवर हजर न होणार्‍या पाच वैद्यकीय अधिकार्‍यांचे निलंबनाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी भोसले यांच्या निलंबनाच्या आदेशात पारनेर तहसीलमधील अव्वल कारकून आणि सुपा मंडलाधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार असणार्‍या शिंदे यांच्याकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड ऑक्सिजन टँकरवर देखरेखीची जबाबदारी होती. शिंदे यांनी ऑक्सिजनचा टँकर चाकण, तळोजा, मुरबाड येथील उत्पादक युनिटपासून नगर जिल्हा रुग्णालय, रिफीलर प्लॅन्टपर्यंत विनाअडथळा पोहचविण्याची जबाबदारी दिलेली होती.

करोना काळामध्ये कामांमध्ये कुचराई करणार्‍यांची गय केली जाणार नाही. सुपा येथील मंडल अधिकारी शिंदे यांच्या प्रमाणेच नेमणुकीचे आदेश दिलेल्या पाच वैद्यकीय अधिकारी संबंधीत कोविड सेंटरवर हजर झालेले नाही. त्यांची हजर होण्याची मुदत गुरूवारी संपली असून त्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.

ज्योती देवरे, तहसिलदार पारनेर

रविवार (दि.2) रोजी लिंडे एअर प्रोडक्टस्, तळोजा, (जि.रायगड) येथून मेडिकल ऑक्सिजन भरुन हा टॅकर विनाअडथळा नगर येथे पोहचविण्याची जबाबदारी शिंदे यांच्याकडे असतांनाही त्यादिवशी सायंकाळी गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडून तळोजा येथे जाण्यासाठी वाहन ताब्यात घेवून पोलीस पथकासह ऑक्सिजन टॅकर सोबत जाणे अपेक्षित असताना शिंदे गेले नाहीत. रविवार (दि.2) रोजी रात्री 10.30 वाजता समन्वय अधिकारी (ऑक्सिजन पुरवठा) यांना मोबाईलवर मेसेज करुन ऑक्सिजन टँकरच्या ड्रायव्हरला झोप आलेली आहे. त्यामुळे पथकातील सर्व कर्मचारी चाकण येथे विश्रांती घेवून पहाटे दोन वाजता तळोजा येथे जाण्यासाठी निघणार असलेचे कळविले. त्यानंतर समन्वय अधिकारी यांनी शिंदे व ऑक्सिजन टँकरच्या ड्रायव्हरला यांना रात्री अनेकवेळा भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता, त्याना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पहाटे 4.30 वाजता शिंदे यांचेशी संपर्क झाल्यानंतर पथकातील कर्मचार्‍यांबाबत विचारणा केली असता पोलीस पथक हे पोलीस मुख्यालयी असून व ते स्वतः घरी असल्याचे सांगितले.

यामुळे जिल्हा रुग्णालय, रिफीलर प्लॅन्टवर ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर होऊ शकला नाही. शिंदे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामात हलगर्जीपणा करुन कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे जिल्हाधिकारी भोसले यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शिंदे यांना आता श्रीगोंदा येथे नेमणुक देण्यात आली असून तेथील मुख्यालय तहसिलदार श्रीगोंदा यांची पुर्वसंमती त्यांना शिवाय सोडता येणार नाही, असे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अशाच प्रकारे तालुक्यात नियुक्ती केलेल्या कोविड सेंटरवर हजर न होणार्‍या पाच वैद्यकीय अधिकार्‍यांची निलंबनाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आलेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या