Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पोलिसांचा मोक्का कारवाईचा विक्रम

नाशिक पोलिसांचा मोक्का कारवाईचा विक्रम

नाशिक । प्रतिनिधी

आनंदवली खून प्रकरणी 20 भूमाफियांवर मोक्काची कारवाई करतानाच नाशिक शहर पोलिसांनी मागील दहा वर्षातील विक्रम मोडीत काढला आहे. अवघ्या पाच महिन्यात 79 सराईतांवर मोक्का कारवाई करण्यात आली असून हा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात विक्रम मानला जात आहे.

- Advertisement -

शहरामध्ये संघटीत भुमाफियांची चलती आहे. करोनाचा अपवाद वगळता प्लॉट, फ्लॅट बळकावणेे, त्यासाठी कट करस्थाने करून हत्या, धमकावणे असे प्रकार घडतात. मात्र, आनंदवली भागात झालेल्या मंडलिक हत्या प्रकरणात शहर पोलिसांनी थेट मोक्काची कारवाई केली. पोलिसांच्या या भुमिकेमुळे शहरातील गुन्हेगारी क्षेत्रच नव्हे तर भुमाफिया म्हणून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अडकलेल्या व्हाईट कॉलर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी तडीपारी, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कारवाई यासह मोक्काचे शस्त्र उगारले आहे. ही कारवाई करताना त्यांनी कोणताही हाच्चा राखला नाही. मागील पाच महिन्यात चार टोळ्यांवर पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यास मंजुरी दिली. त्यात एका टोळीत 23, दुसर्‍यामध्ये 15, तिसर्‍या टोळीत 21 तर चौथ्या टोळीत 20 जणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे यातील बहुतांश संशयितांना अटक करण्यात आली आहे.आतापर्यत मागील दहा वर्षात शहर पोलिसांनी 2019 मध्ये सर्वाधिक 32 जणांवर कारवाई केली आहे. तत्पुर्वी 2016 मध्ये 27 जणांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाया आतापर्यंत सर्वात मोठ्या होत्या. परंतु आयुक्तांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेला अडथळा ठरणारांवर मोक्का कारवाईचा धडाका लावला. परिणामी आतापर्यंत 79 जणांवर मोक्का प्रस्तावित करण्यात आला आहे.

मोक्का प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात होते. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त करतात. वरवर हत्या सारख्या प्रकरणात आरोपींना काही महिन्यानंतर जामीन मिळतो. मोक्कामुळे तसे होत नाही. गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी हे एक महत्त्वाचे शस्त्र असून, त्याचा वापर आम्ही करत असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

संघटीत गुन्हेगारी, भूमाफिया, खंडणीखोर अशा समाजकंटकांना चाप लावण्यासाठी मोक्का, एमपीडीए, तडीपारी यासारख्या प्रतिबंधक उपाययोजना आणखीन ठोस पद्धतीने राबवण्यात येतील

– दिपक पांडे, पोलीस आयुक्त, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या