अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील एका उपनगरात राहणार्या तरूणीवर सोनई (ता. नेवासा) येथील तरूणाने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित तरूणीने या प्रकरणी शनिवारी (30 नोव्हेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पद्माकर दरंदले (वय 37, रा. कॉलेज रस्ता, सोनई) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
फिर्यादीच्या लग्नासाठी तिच्या घरचे स्थळ शोधत असताना त्यांची राहुल सोबत ओळख झाली होती. मात्र त्या दोघांचे लग्न झाले नाही. सन 2021 मध्ये फिर्यादी त्यांच्या घरी एकट्याच असताना राहुल घरी आला. त्याने ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. फिर्यादीने विरोध करून देखील त्याने अश्लिल फोटो काढले. त्यानंतर त्याने फिर्यादीला फोन करून पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
फिर्यादीने त्याला सुरूवातीला 10 हजार व नंतर 20 हजार रूपये दिले. त्याने अनेक वेळा फिर्यादीचे दुसर्या मुलासोबत जमलेले लग्न देखील मोडले. त्याने कारमध्ये (एमएच 17 एजे 5657) बसवून डोंगरगणच्या रस्त्याला नेऊन कारमध्येच बळजबरीने अत्याचार केला. जेऊर टोलनाक्याजवळील एका लॉजमध्ये घेऊन जावून अत्याचार केला. 22 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री साडेबारा वाजता फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीला व तिच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार झाल्यानंतर पीडित तरूणीने काल, शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.