Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजछट महापर्वानिमित्त गोदाघाटावर लाखो भाविकांचा जनसागर; रामकुंड परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप

छट महापर्वानिमित्त गोदाघाटावर लाखो भाविकांचा जनसागर; रामकुंड परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

सूर्योपासना, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम असलेल्या छट महापर्वानिमित्त रविवारी (दि. १५) गोदाघाटावर उत्तर भारतीय बांधवांचा अभूतपूर्व जनसागर लोटला. लाखावर भाविकांच्या उपस्थितीमुळे रामकुंडासह संपूर्ण गोदाघाट परिसराला जणू कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी महिला व पुरुष भाविकांनी गोदापात्रात मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पूजासाहित्य, उसाची सजावट, फळांनी भरलेल्या टोपल्या आणि छठी मैय्याच्या जयघोषाने गोदाकाठ भक्तिमय झाला होता.

छटपूजेच्या निमित्ताने सकाळपासूनच गोदाघाटावर भाविकांची रेलचेल सुरू होती. दुपारनंतर गर्दीत मोठी वाढ झाली. रामकुंड, लक्ष्मणकुंड, गांधी तलाव, धनुषकुंड, सीताकुंड, दुतोंड्या मारुती परिसरापासून ते गाडगे महाराज पुलापुढील नदीपात्रापर्यंत भाविकांनी पूजेसाठी गर्दी केली होती. व्रतस्थ महिला व पुरुषांनी नदीपात्रात उभे राहून मावळत्या सूर्याची विधिवत पूजा केली. ऊस, नारळ, विविध फळे, ठेकुआ आणि पूजासाहित्याने सजविलेल्या सूप व दउऱ्याच्या माध्यमातून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यात आले. त्यानंतर छठी मैय्याची आरती करण्यात आली.

चार दिवस चालणाऱ्या या महापर्वाची सुरुवात शुक्रवारी (दि. १३) नहाय-खाय विधीने झाली. शनिवारी (दि. १४) खरना विधी पार पडला. रविवारी सायंकाळी अस्ताचलगामी सूर्याला पहिले अर्घ्य अर्पण करण्यात आले. रात्रभर निर्जळी उपवासाचे व्रत पाळल्यानंतर सोमवारी (दि. १६) पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून व्रताची सांगता होणार आहे. कुटुंबाचे सुख-समृद्धी, संततीचे दीर्घायुष्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी भाविकांनी प्रार्थना केली.

शिवतांडव, राधा-कृष्ण अन् माँ कालीचे देखावे
छटपूजेनिमित्त विविध संस्थेच्या वतीने गांधी तलाव परिसरातील श्री चक्रधर स्वामी मंदिराजवळ भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान श्री राधा-कृष्ण यांचा मनमोहक देखावा, भगवान शंकर व माता पार्वती यांचे दिव्य स्वरूप, शिवतांडव नृत्याचे सादरीकरण आणि माँ कालीचा भव्य देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरले.भोजपुरी भजन आणि कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हे देखावे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

२५ वर्षांची परंपरा कायम
गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून छटपूजा महोत्सवाची परंपरा जपली जात आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच भाविकांसाठी मोफत चहा वितरणाचा उपक्रमही राबविण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमापती शंभुनाथ ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्योजक गोविंद झा यांनी अध्यक्षस्थान भूषविले. महंत भक्तिचरणदास महाराज यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आमदार देवयानी फरांदे,माजी आमदार बाळासाहेब सानप, के. सी. पांडे, मनीष मिश्रा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश गीते, माजी उपमहापौर गुरमीत बग्गा,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हीरालाल परदेशी, संतोष कोकाटे, मदन जाधव, प्रकाश चव्हाण, श्याम विश्वकर्मा, जयकृष्ण दवे, अयोध्या यादव, भरत जोशी, रवी सोनार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन व्रताची सांगता
सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर अनेक भाविकांनी घरची वाट धरली. मात्र, व्रतस्थ महिला व पुरुष रात्रभर उपवासाचे व्रत पाळणार असून, सोमवारी पहाटे पुन्हा गोदापात्रात एकत्र येत उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करतील. छठी मैय्याची पूजा आणि पारण केल्यानंतर चार दिवसांच्या छट महापर्वाची सांगता होणार आहे.

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील दुर्गम भागांसाठी ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
गडचिरोली | वृत्तसंस्था Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांना आरोग्यसेवा थेट त्यांच्या गावात उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. खनिज बाधित...