Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारमोबाईल चोरीच्या संशयावरुन अल्पवयीन मित्राने केला अल्पवयीन मित्राचा खून

मोबाईल चोरीच्या संशयावरुन अल्पवयीन मित्राने केला अल्पवयीन मित्राचा खून

खापर | वार्ताहर KHAPAR

मोबाईल चोरी झाल्याच्या वादातून दोन अल्पवयीन विद्यार्थी मित्रांमध्ये वाद झाला. यात एका मित्राने दुसर्‍या मित्राचा चाकूने भोसकून खून (Murder by stabbing) केल्याची घटना अक्कलकुवा शहरातील जामिया संकुलात घडली.

- Advertisement -

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा शहरातील जामिया संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणार्‍या व जामिया वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या इयत्ता आठवीतील पंधरा वर्षीय तर्की फैजुल उर रहेमान अब्दुल खालिक याच्या मोबाईल फोनची चोरी झाली.

या मोबाईलची चोरी मित्राने केली या संशयावरुन त्यांच्यात वाद झाल्याचे समजते. यातूनच अल्पवयीन विद्यार्थ्याने तर्की फैजूल उररहेमान अब्दुल खालिक याचा चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

दि.६ डिसेंबर रोजी नियमित शाळा सुटल्यानंतर दुपारी दीड वाजेनंतर ते रात्री नऊ वाजेच्या वाजेच्या सुमारास इंग्लिश माध्यमाच्या जुन्या शाळेच्या इमारतीतील मुलांच्या प्रसाधन गृहात आरोपी अल्पवयीन मुलाने मयत मुलाला बोलावून त्याच्यावर चाकूने मानेवर तसेच पोटावर वार करून ठार केले.सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनंतर पोलीसांनी १४ वर्षीय एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

याबाबत जामिया शैक्षणिक संकुलाचे पब्लिक रिलेशन अधिकारी शेख जावेद बनू पटेल यांच्या फिर्यादीवरून या अल्पवयीन आरोपीवर भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपाधीक्षक संभाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

या गुन्ह्यातील आरोपी केवळ तीन तासात तपासाची चक्रे फिरवून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, फौजदार रितेश राऊत, रमेश पाटील, महाजन पोलीस कर्मचारी कपिल बोरसे, खुशाल माळी, किशोर वळवी, आदिनाथ गोसावी, कल्पेश कर्णकार, प्रशांत यादव अविनाश रंगारी यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

मयत विद्यार्थ्यावर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयत मुलाच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या दृश्याने संपूर्ण परिसर सून्न झाला.

मयत विद्यार्थी हा जुन्या इंग्रजी शाळेच्या शौचालय/ स्नानगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. शहरातील जामिया शैक्षणिक संकुलात प्रथमच अशी खळबळजनक घटना घडल्याने संपूर्ण संकुलामध्ये शोककळा पसरली आहे.

या संकुलात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारे हे दोन्ही एकाच वर्गात शिक्षण घेत होते. विशेष म्हणजे दोन्ही गुजरात राज्यातील रहिवासी असून मयत हा अहमदाबाद येथील तर आरोपी हा सोनगड येथील रहिवासी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या