श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पूर्वी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून सहज मिळणारे जन्मतारखेचे दाखले नवीन नियमामुळे पडताळणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवले जात असल्याने व तेथून पडताळणीला खूपच उशीर होत असल्याने जन्मतारखेचे दाखले वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आधारकार्ड तयार होत नाही. आणि आधारकार्ड शिवाय संच मान्यता होत नसल्याने यावर्षी शाळेची पटसंख्या आणि संच मान्यता अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थी असून सुद्धा आधारकार्ड अभावी त्यांचा समावेश संच मान्यतेच होत नसल्याने पर्यायाने शाळांमधून शिक्षक कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालून जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे असलेली यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पूर्वी मुख्याध्यापकाच्या बोनाफाईडवरून आधारकार्ड तयार होत होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर काही दिवसात आधारकार्ड मिळत होते. मात्र गेल्या वर्षीपासून जन्म तारखेचा क्यूआर कोडचा दाखला अत्यावश्यक करण्यात आला. त्याचबरोबर जन्मतारखेच्या दाखल्यासाठी अर्ज दिल्यानंतर तो अर्ज नगरपालिका किंवा ग्रामपंचायती मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. त्या ठिकाणी त्याची रेकॉर्डनुसार तपासणी केली जाते. सदर तपासणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे एकच लॉगिन उपलब्ध असल्याने जिल्हाभरातून येणार्या पडताळणीसाठी येणार्या दाखल्यांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे पडताळणी होऊन परत ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये दाखला मिळण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा अवधी लागत आहे. या दरम्यान 30 सप्टेंबर रोजी शाळांच्या शिक्षक व संच मान्यता होणार आहेत. त्यापूर्वी आधारकार्ड तयार होणे आवश्यक आहे. आधारकार्डसाठी जन्मतारखेचाच दाखला ग्राह्य धरला जात असल्याने पालकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
लोणी ग्रामपंचायतमध्ये पीएमटी हॉस्पिटलमध्ये जन्मणार्या मुलांची नोंद आहे. जिल्हाभरातून त्या ठिकाणी मुलांचे जन्म झालेले असून लोणी ग्रामपंचायतमध्ये पाच ते सहा हजार अर्ज प्रलंबित असल्याचे समजते. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्याकडून एकच लॉगिनमुळे धिम्या गतीने काम सुरू आहे. त्यामुळे मुलांना जन्मतारखेचे दाखले मिळत नसल्याने आधारकार्ड तयार होत नाही व आधारकार्ड नसल्याने संच मान्यतेमध्ये त्या विद्यार्थ्यांचा समावेश होत नाही. या सर्व अडचणीमुळे शाळांच्या संच मान्यता अडचणी सापडले आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पडताळणीसाठी येणारे दाखले स्थानिक पातळीवरच सक्षम अधिकार्यांना अधिकार देऊन जागेवर पडताळणी करावी, व पालकांची अडचण दूर करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. तसेच पूर्वीप्रमाणे मुख्याध्यापकाचा बोनाफाईड दाखला ग्राह्य धरावा, अशी मागणी शिक्षक वर्गातून केली जात आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे जन्मतारखेचे दाखले पडताळणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवले जातात. तेथे जिल्हाभरातून लोड असल्याने उशीर होत आहे. शाळेसाठी आवश्यक असलेले दाखले तातडीने मिळावेत यासाठी आमची यंत्रणा कार्यरत आहे.
– अरुण लांडे, नगरपरिषद आरोग्य विभाग
आधारकार्डसाठी जन्मतारखेचा दाखला आवश्यक आहे. आणि हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने आधारकार्ड तयार होत नाही. त्यामुळे संच मान्यतेमध्ये अशा विद्यार्थ्यांची गणना केली जात नाही. याबाबत शासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा.
– नानासाहेब बडाख, शिक्षक




