मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याची त्यांनी माहिती दिली आहे. ते पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहणार असल्याची माहिती त्यांनी ‘x’ वर पोस्ट करत दिली. त्यांच्या या पोस्टनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी त्यांना काळजी घ्या म्हणून सल्ला दिला आहे. असे असतानाच आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही संजय काका काळजी घ्या असे म्हणत पोस्ट केली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
काळजी घे संजय काका, प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे! अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे.
खासदार संजय राऊत नेमके काय म्हणाले?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र ! आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेमही केले. पण सध्या अचानकपणे माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकर बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्याच आले आहेत. त्याला नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षांत आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. असं म्हणत संजय राऊत यांनी ही पोस्ट केली आहे.
संजय राऊत यांची महत्वाची भुमिका
संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटातील महत्त्वाचा चेहरा आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग असो किंवा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे असो या सगळ्यांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. २०१९ ला भाजपासोबत युती तुटल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा शिवसेनेकडून किल्ला लढवण्याचे काम संजय राऊत यांनीच केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असा संजय राऊत यांचा लौकिक आहे. ते समाना दैनिकाचे संपादकही आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




