अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असली तरी संबंधित सर्व प्रमुख नेत्यांच्या बोलण्यामध्ये एकसूत्रता राहिलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांसाठीची गर्दी पाहता सभासदांनी स्वतःहून अर्ज घेण्यास सुरूवात केली असल्याचे दिसते आहे, असा दावा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बुधवारी (30 सप्टेंबर) येथे केला.
सभासदांनी आत्तापर्यंत 680 अर्ज घेतले आहेत. यावरून निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होते, असे सूचक भाष्यही त्यांनी केले. जर एखाद्या गोष्टीचा निर्णय करणार असतील तर सर्वांना सोबत घेतले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही निवडणूक लढवण्याचे शिंदे यांनी मागेच जाहीर केले होते व त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शिंदे यांनी बुधवारी सकाळी 10.30 वाजता उमेदवारी अर्ज घेतला. यासाठी ते जिल्हा बँकेच्या चाहुराणा-मार्केट यार्ड शाखेत आले होते. आता ते प्रत्यक्ष उमेदवारी कधी दाखल करतात याची उत्सुकता आहे. अर्ज घेतल्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवायची आहे. पण बिनविरोधच्या चर्चांमुळे माझ्या मनामध्ये अजून तोच प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीमध्येही पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या मतानुसार त्यांना बिनविरोधसंदर्भातील बैठकीबाबत काही माहीत नाही. शिवसेना एकीकडे बैठक घेत आहे आणि म्हणून त्यासंदर्भात सभापती म्हणून मला भूमिका घेण्याची वेळ अजून आली की नाही असा प्रश्न मला पडला आहे, असे भाष्य करून शिंदे म्हणाले, संगमनेर येथे बैठक झाल्यानंतर मला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आ. विवेक कोल्हे यांचा फोन आला होता. मात्र, त्यानंतर यासंदर्भात कुठलीही चर्चा माझ्यासोबत कोणीही केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राखीव पदांबाबत भाष्य करताना ते म्हणाले, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच मी अर्ज घेतलेला आहे. त्याबाबत आणखी विचार करूनच आता तो अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट करून प्रा. शिंदे म्हणाले, अनेक कारखान्यांवर कोट्यवधी रूपयांचे कर्ज असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. मी कुठल्याही संस्थेचा थकबाकीदार नाही, असेही शिंदे यांनी आवर्जून स्पष्ट केले.
दरम्यान, माझ्या मनधरणीचा प्रश्न येत नाही. नेत्यांनी त्याबाबत बोलले पाहिजे. मी काही बोलू शकत नाही. संगमनेरमध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये बिनविरोध करण्याचा निर्णय झालेला असेल. मात्र, असे असले तरी सभासदांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यावरून बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होते, असे सूचक भाष्यही त्यांनी केले.




