अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील एकल, विधवा व परित्यक्त्या महिलांसाठी सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने 6 अशासकीय सदस्यांची समिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे एकल महिलांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करणार्या व्यक्तींना धोरणनिर्मितीत सहभागी करून घेण्यात आले आहे. एकल महिला म्हटले की केवळ विधवा महिलांचा विचार करून चालणार नाही. घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळणार्या महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. आर्थिक स्वावलंबन, रोजगार, निवारा, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, मुलांचे शिक्षण, वारसाहक्क, सरकारी योजनांचा लाभ आणि समाजातील सुरक्षितता अशा अनेक पातळ्यांवर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करणारे स्वतंत्र आणि सर्वंकष धोरण किती प्रभावी ठरते, याकडे लक्ष लागले आहे.
महिला व बाल विकास विभागाने 22 मेच्या शासन निर्णयानुसार धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन केली होती. महिला व बाल विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी आहेत. आता वर्षा परचुरे, प्रा. उत्तरा बचुटे, अॅड. प्रिया राघवेंद्र भारस्वाडकर, मीरा अरविंद कडबे, अॅड. हेमल गणपतराव साठे आणि भावना अनिल नखाते या सहा अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती स्थापन करणे ही केवळ सुरुवात आहे. राज्यात विविध योजनांचा लाभ मिळत असतानाही पात्र लाभार्थ्यांपर्यंत माहिती, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रशासकीय प्रक्रियेअभावी लाभ पोहोचत नसल्याच्या तक्रारी कायम असतात. एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करताना अशा प्रशासकीय अडथळ्यांवर ठोस उपाययोजना होणार केली जाणार आहे.




