अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुकांकडून अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. काल, बुधवारपर्यंत तब्बल 680 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, प्रत्यक्षात केवळ 11 अर्ज दाखल झाले आहेत.
बुधवारी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार मोनिका राजळे आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक इच्छुकांनी निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. बुधवारी दिवसभरात 149 अर्जांची विक्री झाली. यामुळे निवडणूक कार्यालयातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची संख्या तुलनेने अत्यल्प आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार्यांमध्ये बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड (पारनेर), संजयकुमार कर्नावट (पारनेर), चंदा गंगाधर गर्जे (शेतीपूरक, पाथर्डी) आणि आजिनाथ हजारे (जामखेड) यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने गुरूवार आणि त्यानंतर सोमवार असे अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे आज, गुरूवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सभापती शिंदे यांनी बुधवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कर्जत आणि जामखेड या दोन मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज घेतले. दुपारच्या सुमारास खा. लंके आणि बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांनी निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतले. आ. राजळे आणि आ. कर्डिले यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अर्ज मागवून घेतले.




