मुंबई | Mumbai
बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा स्विकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आली आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की, फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हे सरकार बरखास्त झाले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आपण पाहत आहे. कुठे लहान मुलींवर, महिलांवर बसमध्ये बलात्कार होत आहे. त्यावर गृहराज्यमंत्री म्हणतात हे शांततेत झाले म्हणून आम्ही काही करू शकत नाही.”
“डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. आम्ही हिच मागणी करत होतो की, पारदर्शक चौकशीसाठी आका म्हणून ज्यांचे नाव येत आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आम्हीच नाही तर भाजपाचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते. भाषणे झाली, प्रत्येकाने भाषणे दिली. सर्वांनीच भयंकर वर्णन केले आहे. हे सर्वझाल्यावर आम्हाला वाटले होते की मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. याआधी सुद्धा याच मुद्यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती. पण सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण काल हे फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. काल रात्री देवगिरीवर झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला.त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांचा पीए हा त्यांचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तो राजीनामा स्वीकारल्याचे माध्यमांसमोर सांगितले.
“मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते?, मैत्रीच्या नात्यात बांधले होते? कोणत्या कारणामुळे बांधले होते हे आम्हाला माहित नाही. न्याय देऊ असे सांगितले होते. चौकशी लवकर पूर्ण होईल असे सांगितले होते. अधिवेशन सुरू झाल्य़ावर काल जे भयानक फोटो आले मला वाटत नाही की महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल. सगळेच हादरून गेले. डोळ्यात पाणी होते. कुटुंबाला काय वाटत असेल हे कळत नाही. माझे ही मन हलून गेले आहे. सरपंचाला न्याय द्या. आपण चाललोय तरी कुठे?” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आणि आता .या संपूर्ण राजीनामा नाट्यानंतर आज केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर महायुतीतील नेत्यांकडूनही कानपिचक्या देण्यात आल्याचे दिसले. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही या प्रकरणी एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “मस्साजोगचे सरपंच संतोषदेशमुख यांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराड या क्रूरकर्माला आता फासावरच लटकवा ” अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा