Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भाव दिंडी : भाग १५ - इंद्रनीळ तनु, प्रसन्न वदन

आषाढीची भाव दिंडी : भाग १५ – इंद्रनीळ तनु, प्रसन्न वदन

नंदन रहाणे

सौंदर्याचे आकर्षण ही एक सहज मानवी प्रवृत्ती असते. जे जे म्हणून काही सुरेख, सुरंग, सुगंध, सौष्ठवपूर्ण दिसेल त्याकडे माणूस आपोआप ओढला जातो. सुंदरतेचे वैशिष्ट्य हे असते की तिचे अस्तित्व स्वयंभू असते. हे सुंदर आहे, यांच्याकडे आकर्षित व्हा असे सांगावे लागत नाही. आकाशातले इंद्रधनुष्य, मोराचा फुललेला पिसारा, कड्यावरुन कोसळणारा धबधबा, सिंहाची दिमाखदार चाल, अंगभर फुललेले गुलमोहराचे झाड, कुरणावर सळसळत जाणारा नाग, कमळांनी दाटलेले सरोवर, पदन्यासात रंगून गेलेली नृत्यांगना… हे सारेच आपले लक्ष चटकन् वेधून घेतात. त्यासाठी त्यांना वेगळे प्रयास करावेच लागत नाहीत! स्वयंसिध्द सौंदर्याची जादुही तशीच स्वयंस्फूर्त असते! तिच्या वलयाने माणूस मोहित होतोच होतो! सौंदर्याची आराधना आणि सामर्थ्याची उपासना जगात सर्वत्र केली जाते ती काही उगाच नव्हे… आपलेही जीवन तसेच बनावे अशी आंतरिक इच्छा त्यामागे वसत असते. ऐहिकाप्रमाणेच अध्यात्मातही सौंदर्याचाच बोलबाला आहे.

- Advertisement -

ज्यांचे पूजन, अर्चन आपण करतो, ते आपले देव पहा… सौंदर्याची, सामर्थ्याची एकेक संकल्पनाच त्यांच्यातून साकार केली गेलीय. वीणावादन करणारी धवलवस्त्रधारिणी सरस्वती असो की घोड्यावर स्वार झालेला रणावेशातला खंडोबा असो, कमळात उभी राहून धनवर्षा करणारी लक्ष्मी असो की प्रशांत मुद्रेने अभयहस्त दाखवणारा गौतम बुद्ध असो, 18 हातांत 17 प्रकारची आयुधे धारण करुन महिषासुराला मारणारी दुर्गा असो की उघड्या आकाशाखाली कार्यात्सर्ग मुद्रा धारण केलेला विराट बाहुबली गोम्मटेश्वर असो… या सार्‍यांकडे पाहताच, एकेका गुणाचा दैवी परमोत्कर्ष त्यांच्याठायी झाल्याचे आपल्याला जाणवते आणि मन श्रद्धेने लीन होते. भारतीय धार्मिक मनाने पूज्य मानलेल्या अशा सर्व देवदेवतांमध्ये आणि थोर सत्पुरुषांमध्ये जर सौंदयनिर्मितीच्या अंगाने सर्वोच्च शिखर कुठले गाठलेले असेल तर ते आहे… भगवान कृष्णाच्या रुपाने! गोकुळातल्या गवळ्याच्या घरात वाढलेला हा देव अगदी पाळण्यापासून रणांगणापर्यंत सर्वत्र परमसुंदरच दिसतो –

इंद्रनीळ तनु, प्रसन्न वदन ।
दर्शन दीप्त जाण ।
हीरेयांचे ॥1॥
अडो नका, सरा,
पाहू द्या गोपाळ ।
डोळियां सुकाळ ।
होईल आजी ॥2॥
कंठी वैजयंती,
नयन पुंजाळती ।
आरत्या ओवाळती ।
गोपबाळा ॥3॥
काळासी अटक,
योगियांचे हेत ।
परसा भागवत ।
जवळी उभा ॥4॥

संत श्रीनामदेवांचे शिष्य व मित्र परसा भागवत यांचा हा अभंग लहानसा आहे; पण श्रीकृष्णाचे सौंदर्य फारच नेटकेपणाने वर्णन करतो. त्याच्या सावळेपणाचे दर्शन घेतांना बहुतेक कवींनी ‘मेघ:श्याम’ किंवा ‘घन:श्याम’ अशी विशेषणे वापरली आहेत. परसोबांनी ‘इंद्रनील’ रत्नाची उपमा देऊन बहार आणलीय, या कृष्णाच्या तनुचा म्हणजे त्वचेचा रंग कसा? तर नीलरत्नसारखा! एकाच शब्दात तरलसे चित्र उभे करुन ते पुढे म्हणतात, याचे मुखमंडल अगदी प्रसन्न आहे. याचे दर्शन इतके तेजस्वी की जणू दीप्तिमंत हिर्‍यांचा कोशच दृष्टीपुढे आल्यासारखे वाटावे! त्याच्या आणि माझ्या आड नका येऊ, बाजूला सरा तुम्ही… मला त्या गोपाळास मन भरुन पाहू द्या… डोळ्यांना अगदी सुकाळ झाल्यासारखे वाटले पाहिजे. या कृष्णाने आपल्या कंठात वैजयंती माला धारण केलेली आहे. ती इतकी सुंदर आणखी दिव्य आहे की बघणार्‍यांचे नयन देखील तेजाने पुंजाळल्यासारखे होतात. अशा या वृंदावनाच्या रंगनायकाला गोकुळातल्या गोपिका आरत्यांची तबके हाती घेऊन मन:पूर्वक ओवाळीत आहेत!

हा प्रसंग पाहतांना असे वाटते की, जणू काही काळच थांबला आहे आणि त्यांच्या साक्षात्काराचे ध्येय जपी, तपी, योगी, ऋषी, मुनी तपश्चर्या करतात, तो त्यांचा हेतूच इथे सफल झाला आहे. या परसा भागवताचे भाग्य किती थोर की मी या प्रसंगी त्या यदुरायाच्या अगदी जवळ उभा आहे!

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...