Monday, October 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ महाकुंभमेळा : रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी काटेकोर नियोजन करा...

सिंहस्थ महाकुंभमेळा : रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी काटेकोर नियोजन करा – कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश

नाशिक । जिमाका वृत्तसेवा

- Advertisement -

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारे ध्वजारोहण सोहळे सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी पास व्यवस्थापन, आसनव्यवस्था, वाहतूक, पार्किंग तसेच प्रवेश व निर्गमन मार्गांचे काटेकोर नियोजन करावे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

ध्वजारोहण सोहळ्याच्या पास व्यवस्थापन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्राधिकरणाच्या समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पास वितरण व आसनव्यवस्थेचे नियोजन

रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी मान्यवर, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या प्रवेशासाठी पास वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. यासोबतच विभागनिहाय आसनव्यवस्था निश्चित करून प्रवेश नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. संबंधित विभागांनी उपस्थितीचा आढावा घेऊन आसनव्यवस्थेचा आराखडा तयार करावा आणि त्याची माहिती संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.

दोन्ही ठिकाणी गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी प्रवेशद्वारे, निर्गमन मार्ग, बॅरिकेडिंग आणि मान्यवरांच्या हालचालींचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. मुख्य मंचासमोरील जागा मोकळी ठेवणे, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आणि उपलब्ध जागेनुसार विविध श्रेणींतील निमंत्रितांची बैठक व्यवस्था निश्चित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

वाहतूक, पार्किंगसाठी स्वतंत्र आराखडा
ध्वजारोहण सोहळ्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये आणि उपस्थितांना कार्यक्रमस्थळी पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी वाहतूक व पार्किंगचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रमुख शासकीय कार्यालयांमधून सामूहिक बससेवेचा पर्याय विचारात घेऊन जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अन्य कार्यालयांशी समन्वय साधावा. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचे नियोजन करताना वाहनतळ, बसमधून उतरण्याची ठिकाणे, प्रवेशद्वारे आणि कार्यक्रमस्थळापर्यंतचा मार्ग दर्शविणारा नकाशा तयार करावा, असे बैठकीत सूचित करण्यात आले.

मान्यवर आणि नागरिकांना मार्गदर्शन करणे सुलभ व्हावे, यासाठी दिशादर्शक फलक, प्रवेशमार्ग व पार्किंगची माहिती देणारे नकाशे तसेच मार्गदर्शनपर अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करण्याबाबतही चर्चा झाली. रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आसनव्यवस्था, माध्यम विभाग आणि बॅरिकेडिंगचा अंतिम आराखडा निश्चित करण्यावर भर देण्यात आला.

गोदाआरतीसाठीही गर्दी व्यवस्थापन
रामकुंड येथे सायंकाळी होणाऱ्या गोदाआरतीच्या वेळी भाविक व पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. आरतीस्थळी येण्या-जाण्याचे मार्ग, बॅरिकेडिंग, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन मार्ग खुले ठेवण्यास प्राधान्य द्यावे. भाविकांची सुरक्षितता अबाधित राखून त्यांना आरतीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणारे ध्वजारोहण सोहळे नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात. तसेच प्रवेश, वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि नागरिकांना मार्गदर्शन या बाबींमध्ये समन्वय राखून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक l प्रतिनिधी Nashik राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे...