मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत असतानाच, महायुतीमधील अंतर्गत कलह आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे आक्रमक नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी ‘थोरल्या भावा’वर म्हणजेच भाजपवर थेट निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“सोबत येऊन जर अशी वागणूक मिळणार असेल तर मनात पश्चातापाच्या गोष्टी येतात,” असे खळबळजनक वक्तव्य करत सत्तार यांनी आपल्या मनातील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाण्यात छत्रपती संभाजीनगरमधील सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “स्थानिक पातळीवर मित्रपक्षाकडून आमची मोठी अडवणूक केली जात आहे. जिल्ह्यात सध्या आमच्या विरोधात अनेक घडामोडी घडत असून, हक्काचा निधीही मिळत नाहीये. मोठा भाऊ लहान भावाकडून सगळी सत्ता काढून घेतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर आमच्या नेत्यांनी वेळीच याची दखल घेतली नाही, तर २०२९ पर्यंत परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाईल,” अशी भीती सत्तार यांनी व्यक्त केली. स्थानिक भाजप नेत्यांच्या त्रासामुळे आज पक्षातील अनेक आमदार बेचैन असल्याचेही त्यांनी उघड केले.
या सर्व वादाच्या आणि वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतले होते. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात आणि आगामी विधान परिषद निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, अब्दुल सत्तार यांना महायुतीचे नियम पाळण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सत्तारांच्या नाराजीवर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र बैठक घेतली जाईल. यावर बोलताना सत्तार म्हणाले, “एकनाथ शिंदे जे बोलतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. विधान परिषद निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या शिंदेंच्या आदेशाचे आम्ही पालन करू.”
“छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे ६ आमदार आणि १ खासदार असतानाही, आम्ही भाजपला सत्तेत वरचे स्थान दिले कारण आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय. आमचा त्याग कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो विसरली आहे,” असा टोला सत्तार यांनी लगावला. आत्तापासूनच जर अशी वागणूक मिळणार असेल, तर २०२९ च्या निवडणुकीत ही युती कायम राहील का, यावर विचार करावा लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर स्पष्टीकरण देताना सत्तार म्हणाले की, “हे वक्तव्य मूळचे ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचे होते, त्यावर मी केवळ प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही बाजूंच्या पक्षप्रमुखांनी यावर विचार करावा.” आता या अंतर्गत वादावर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा वाद कसा मिटवतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




