नवी दिल्ली | New Delhi
कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. १६ ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क, कनॉट प्लेस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे राजधानीत राजकीय वातावरण तापले आहे.
या कारवाईदरम्यान अभिजीत दिपके यांच्या हातात भारतीय राष्ट्रध्वज होता. घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यांना रोखले. आपण एकटे असताना आपल्याला का अडवले जात आहे, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनातून अज्ञातस्थळी नेण्यात आले. दरम्यान,नेहा बोरा यांना पोलिसांनी सोडल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीत आज सकाळपासून हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
दरम्यान, सीजेपीने लहरा दो तिरंगा मोहीम यशस्वी झाल्याचं घोषित केलं. शुक्रवारी संध्याकाळी, १६ ऑक्टोबर रोजी, कॉनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला. सीपीमधील तिरंगा मार्चच्या आधीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं. दिपके यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले असल्याचा दावा सीजेपीने केला आहे. तरीही, असे असूनही, तेथे मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.
नेमकं काय घडलं?
‘कनॉट प्लेस’च्या सेंट्रल पार्कमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता तिरंगा फडवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दिपके यांनी केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दुपारीच दिपके राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना नोटीस बजावली. नागरिक, व्यापारी आणि प्रवासी यांच्या अधिकारांवर गदा आणणारे कृत्य करू नका, असा इशारा त्यांना या नोटिशीतून देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही दिपके यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० चा वापर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी केला जातो. कलम १२६ अंतर्गत, शांतता राखण्यासाठी दंडाधिकारी जामीन घेतात, तर कलम १७० पोलिसांना शांतताभंग किंवा संभाव्य गुन्हा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक अटक करण्याचे अधिकार देते.
मी काय गुन्हा केला?’ दिपके यांचा पोलिसांना सवाल
ताब्यात घेत असताना अभिजीत दिपके यांनी पोलिसांना आपण नेमका कोणता कायदा मोडला, असा सवाल केला. आपण एकटेच घराबाहेर पडल्याचे सांगत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला.
दिपके यांनी यापूर्वीही पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. शांततेत तिरंगा फडकवणे हा गुन्हा नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. पोलिसांनी मात्र कनॉट प्लेस परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याचे आणि अधिकृत परवानगीशिवाय रॅली काढता येणार नसल्याचे सांगितले.
नेहा बोराही ताब्यात; शनिवारी सुटका
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांनाही शुक्रवारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आले होते. त्या मंडी हाऊस येथून समर्थकांसह कनॉट प्लेसच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. शनिवारी सकाळी नेहा बोरा यांची सुटका करण्यात आली. दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.




